Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवायांमुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए विभाग राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाई करत आहे. भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, शाळा आणि महाविद्यालयातील कॅन्टीन, खाणावळी अशा अनेक ठिकाणी धाडी टाकत भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते ‘ॲक्शन मोड’मध्ये पाहायला मिळत आहेत. मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची विशेष धडक मोहीम सुरू करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि बेकायदेशीर आस्थापनांवर कडक कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाची मोठी चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी त्यांना २००७ मध्ये मिळालेल्या एका धमकीच्या पत्राचा किस्सा सांगितला आहे. या संदर्भातील वृत्त ‘बिझनेस टुडे’ने दिलं आहे.

दरम्यान, सनदी अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या २१ वर्षांच्या कारकि‍र्दीत घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगांबद्दल भाष्य केलं आहे. एवढंच नाही तर मुंढे यांना २१ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात तब्बल २५ वेळा बदल्यांनाही सामोरं जावं लागलं आहे. तुकाराम मुंढे यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात कठोर निर्णयांमुळे धमक्यांचा सामना कशा प्रकारे करावा लागला होता, याबाबत त्यांनी मोठं भाष्य केलं आहे.

मुंढेंनी सांगितला धमकीचा किस्सा

तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की त्यांना २००७ मध्ये एक धमकी मिळाली होती. तेव्हा ते प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीच्या टप्प्यावर होते. सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यात त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. प्रोबेशन काळात त्यांच्यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. त्या काळात परिस्थिती अतिशय तणावपूर्ण बनली होती. त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागला होता. सोलापूर जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती असताना त्यांच्याविरुद्ध काही महिलांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्नही केला होता असं मुंढे यांनी सांगितलं.

तुकाराम मुंढे यांनी विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून केलेल्या कार्यकाळाची आठवण सांगितली. तेव्हा मुंढे यांनी वाळू माफियांविरुद्ध कारवायांचा धडाका लावला होता. तो भाग आंध्र प्रदेश (आताचं तेलंगणा) सीमेजवळ येतो. या ठिकाणी पदभार स्वीकारल्यानंतर साधारण एक-दोन महिन्यांनी लाल शाईने लिहिलेलं एक पत्र मिळालं होतं, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

“मला एक पत्र मिळालं होतं. माझ्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशा प्रकारचं पत्र मला आलं होतं. पूर्वी किनवटसारख्या भागात नक्षलवादी होते. त्या पत्रात अशी धमकी देण्यात आली होती की, ‘आम्ही नक्षलवादी आहोत आणि आमच्या वाटेला जाऊ नका. अन्यथा तुमचं रक्त सांडेल. त्यामुळे तुम्ही माघार घ्या.’ अशा आशयाचं ते लाल शाईने लिहिलेलं पत्र होतं. मात्र, ते खरं होतं की नाही हे मला माहीत नाही. पण तसं पत्र मिळालं होतं”, असं तुकाराम मुंढे यांनी बिझनेस टुडेच्या ‘इंडिया @१००’ या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.