FDA Diwali Faral Inspection : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते आज पुण्यातील द पूना मर्चंट्स चेंबरच्या लाडू चिवडा विक्रीचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी भेसळखोरांना कडक इशारा दिला असून दिवाळीच्या फराळात भेसळ झाल्याचं दिसून आल्यास लागलीच त्यांच्या पोर्टलवर तक्रार दाखल करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

तुकाराम मुंढे यांनी द पूना मर्चंट्स चेंबरच्या लाडू चिवडाच्या विक्रीचं उद्घाटन करण्यापूर्वी एफडीएकडून गुणवत्ता तपासणी करण्यात आली. गुणवत्तेविषयीच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चार फेजमध्ये मोहीम

तुकाराम मुंढे म्हणाले, आपण सणाच्या २१ दिवस आधी आमि सण झाल्यानंतर ३० दिवस अशा ४ फेजेसमध्ये मोहीम राबवत आहोत. पहिला टप्पा सणाच्या २१ दिवस आधी सुरू झाला होता. यामध्ये प्रामुख्याने मॅन्युफॅक्चरर, वेअरहाऊस, डीलर्स आणि सेमी डीलर्सवर कारवाई केली जाते. जेणेकरून अनसफे किंवा सबस्टँडर्ड रॉ मटेरिअल मार्केटमध्ये येणार नाही. दुसरा टप्पा आता रिटेलमध्ये लाडू आणि फराळाच्या विक्रीच्या वेळी सुरू होत आहे. कारण, आठ-पंधरा दिवस आधीच फराळ तयार होतो. त्यानुसार कारवाई सुरू होते. तसंच, ड्रायफ्रूट्स, स्वीट शॉप, दूधाचे पदार्थ, तेल, मसाले आणि आता दिवाळीनिमित्त तयार होणाऱ्या सर्व पदार्थांवर आपली नजर असून सतत तपासणी सुरू असल्याचंही मुंढे यांनी स्पष्ट केलं. तसंच, आर्टिफिशिअल रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.

पोर्टलवर तक्रार दाखल करा

तसंच, कोणत्याही नागरिकाला काही संशय आला तर ते एफडीए पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतात, असं त्यांनी म्हटलं आहे. “माझी व्यावसायिक समुदायाला एवढीच विनंती आहे की सुरक्षेचे जे नियम आणि बंधनं दिली आहेत त्याचं पालन व्हावं. तसंच, एफडीएन सण आणि अन्नपदार्थांच्या बाबतीत ज्या कंप्लायन्स ऑर्डर्स काढल्या आहेत, त्यांचं तंतोतंत पालन करावं. असं केल्यास तुमचा व्यवसायही चांगला चालेल आणि नागरिकांना कोणताही आजार होणार नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.