ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि मोठ्या रिटेल कंपन्यांचा मुदत संपलेला तसेच खराब झालेला माल फक्त कागदावरच नष्ट दाखवून पुन्हा छुप्या मार्गाने ग्राहकांच्या ताटात पोहोचवला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने या रॅकेटचा पर्दाफाश केला असून संपूर्ण महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी १५ कठोर आदेश जारी केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संपूर्ण गैरप्रकाराची माहिती देत कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कागदावरच मालाची विल्हेवाट; रॅकेट कसे चालायचे?
ई-कॉमर्स कंपन्या आणि मोठ्या सुपरमार्केट्सच्या गोदामांमधून खराब किंवा एक्स्पायर झालेला माल नष्ट करण्यासाठी विशिष्ट यंत्रणांकडे सोपवला जातो. मात्र, प्रत्यक्षात हा माल नष्ट न करता केवळ तसे प्रमाणपत्र कागदावर तयार केले जायचे.
यानंतर हा धोकादायक माल परवाना नसलेल्या गोदामांमध्ये आणि री-पॅकेजिंग युनिट्समध्ये पाठवला जायचा. तिथे उत्पादनावरील मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्स्पायरी डेट बदलून, नवीन पॅकिंगद्वारे दलालांच्या मदतीने पुन्हा किरकोळ दुकानांमध्ये विक्रीसाठी आणला जायचा. अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून लोकांच्या आरोग्याशी उघड-उघड खेळ सुरू असल्याचे एफडीएच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
तपासात आढळल्या मोठ्या त्रुटी
तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण साखळीत मोठे गैरव्यवहार दिसून आले आहेत. माल पाठवणारा आणि स्वीकारणारा एकच व्यक्ती असणे, आंतरराज्य वाहतुकीच्या दिवशीच माल नष्ट झाल्याचे दाखवणे, वजनात आणि कार्टनच्या संख्येत तफावत असणे अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
काही प्रकरणांमध्ये तर अस्तित्वातच नसलेल्या कंपन्यांच्या नावाने पावत्या फाडण्यात आल्या होत्या. गाडीची माहिती, वजन काटा पावती, ई-वे बिल किंवा माल नष्ट करतानाचे व्हिडिओ यांसारखा कोणताही स्वतंत्र पुरावा कंपन्यांकडे नव्हता. यामुळेच एफडीएने तात्काळ पावले उचलत कठोर नियमावली लागू केली आहे.
महाराष्ट्रासाठी नवीन नियमावली लागू; आता नियम काय?
अन्न सुरक्षेचा हा गंभीर धोका रोखण्यासाठी एफडीएने संपूर्ण महाराष्ट्रासाठी तातडीचा अनुपालन आदेश जारी केला आहे. नवीन नियमांनुसार:
- सीसीटीव्ही आणि क्वारंटाईन झोन: प्रत्येक गोदामात खराब आणि एक्स्पायर मालासाठी सीसीटीव्हीच्या पाळतीत असणारा स्वतंत्र ‘क्वारंटाईन झोन’ तयार करावा लागेल. त्यावर ‘मानवी वापरासाठी अयोग्य’ असा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक असेल.
- मालाची नासधूस अनिवार्य: गोदामातून माल बाहेर पाठवण्यापूर्वी त्याची पाकिटे पूर्णपणे फाडून किंवा नष्ट करूनच पाठवावी लागतील, जेणेकरून तो माल पुन्हा विकला जाणार नाही.
- अधिकृत केंद्रांवरच विल्हेवाट: हा माल कोणत्याही परिस्थितीत थेट विक्रीसाठी बाहेर जाऊ शकणार नाही. केवळ शासनाने मान्यता दिलेल्या अधिकृत केंद्रांवरच त्याची विल्हेवाट लावावी लागेल.
अन्न व्यावसायिकांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट संदेश
“राज्यात अन्न सुरक्षा कायदे अधिक पारदर्शक आणि कडक करण्यासाठी आम्ही १५ महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. नियम काय आहेत, व्यावसायिकांनी काय केले पाहिजे आणि नागरिकांचे हक्क काय आहेत, याची स्पष्टता यातून मिळेल. नियम न पाळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
