Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यभरात अनेक ठिकाणी कारवाया सुरू आहेत. अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांवर आतापर्यंत मोठी कारवाई करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहेत. मात्र, अनेकदा तुकाराम मुंढे यांच्या कारवायांवरही सवाल उपस्थित केले जात आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरू असलेल्या कारवायांवर तुकाराम मुंढे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. कारवाई दरम्यान हॉटेल्सचे थेट परवाने का निलंबित करता? हॉटेल्सला थेट टाळे का ठोकता? त्यांना सुधारण्यासाठी एखादी संधी का देत नाहीत? या मुद्यांवर तुकाराम मुंढे यांनी मोठा खुलासा केला. आम्ही केलेल्या कारवाईचा फक्त एकच मुद्दा हायलाईट केला जातो. पण आम्ही बाकीच्या गोष्टी देखील केलेल्या असतात. मात्र, तो मुद्दा हायलाईट होत नाही’, असं तुकाराम मुंढे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना म्हटलं.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

हॉटेल्सवरील कारवाई वेळी तुम्ही थेट कुलूप का लावता? नोटीस देऊन सुधारण्याची संधी तुम्ही देऊ शकता, तुम्ही असं का करत नाहीत? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “काय होतं की काही मीडिया असतात. माझी दररोज प्रेस नोट येत असते. त्या प्रेसनोटमधील कोणता मुद्दा जास्त हायलाईट होतो, तर फक्त लायन्सन सस्पेंडचा. माझ्या प्रेसनोटमध्ये बाकीच्या पण गोष्टी लिहिलेल्या असतात. तुम्ही हवं तर प्रेसनोट चेक करून पाहू शकता. पण त्या गोष्टी हायलाईट केल्या जात नाहीत” असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं.

“आता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे मी हाती घेतल्याचे जवळपास दोन महिने झाले आहेत. या कालावधीत जवळपास १४०० च्या आसपास व्हिजीट झालेल्या आहेत, त्यापैकी १०० ते ११० च्या आसपास लायन्सन सस्पेंडच्या केसेस आहेत. ३०० पेक्षा जास्त फक्त नोटीस देण्याच्या कारवाया झालेल्या आहेत. तसेच बाकीच्यांना काहीही झालेलं नाही. त्यामुळे यामध्ये असं आहे की आपण जेव्हा कारवाई करतो, तेव्हा ती कारवाई नियमानुसार असते. त्यासाठी एक कायदा असतो. कायद्यानुसार, लायन्सन सस्पेंड करण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत. जेव्हा असुरक्षित फूडचा विषय असतो, तेव्हा लायन्सन सस्पेंड केलं जातं”, असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.

तुम्ही कधी उद्विग्न झालात का?

तुम्ही कधी फार उद्विग्न झाला आहात का? आता खूप झालं, हे सहन होत नाही, त्यामुळे तुम्ही उद्विग्न झालात असं कधी घडलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “हो, असं कमीत-कमी चार ते पाच वेळा झालं आहे. असे अनेक प्रसंग आयुष्यात आले आहेत. खरं तर असे प्रसंग कोणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. आता मला ते प्रसंग या ठिकाणी बोलताही येणार नाहीत. अगदी कुटुंबाबरोबरही यावर चर्चा करता येत नाही, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे घरी आपली मुलं असतात, ते यावर काही प्रतिक्रिया देत नाहीत. पण ते सर्व पाहत असतात, ऐकत असतात. त्यामुळे मी एक प्रश्न स्वत:ला विचारत असतो आणि जबाबदारी घेत असतो. समजा मी आता महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्त आहे. मग त्या विभागाची जबाबदारी मी घेणार नाही तर कोण घेणार? असा प्रश्न मी स्वत: ला विचारत असतो”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.