Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाया सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या कामाची राज्यात मोठी चर्चा सुरू आहे.

भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण, शैक्षणिक संस्थांमधील खाणावळी, खाद्यतेल अशा अनेक कारवाया अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आल्या आहेत. आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा शिशु आहार उत्पादनांकडे वळवला आहे.

तुकाराम मुंढे यांनी आज (२९ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत शिशु आहार उत्पादनांच्या विक्रीच्या संदर्भात महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. यापुढे आता शिशु आहार उत्पादनांच्या पॅकेजवर ‘आईचं दूध सर्वोत्तम’, असं लिहिणं बंधनकारक असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात स्तनपानाचं प्रमाण कमी असल्याची आकडेवारी देखील तुकाराम मुंढे यांनी सांगितली आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

“अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अधिकाराच्या अंतर्गत आज शिशु आहार उत्पादनांच्या संदर्भातील हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुरवठादार, ब्रँड मालक, ई-कॉमर्स विक्रेते, विक्रेते किंवा किरकोळ विक्रेते, औषध विक्रेते या सर्वांना ही ऑर्डर लागू असणार आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.

“ही ऑर्डर आताच का काढण्यात आली? तर यामध्ये काही निष्कर्ष आमच्या समोर आले आहेत. आम्ही केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर ही ऑर्डर काढण्याची गरज असल्याचं आम्हाला वाटलं. यामध्ये बेबी सीरियल, हेल्थ मिक्स किंवा न्यूट्रिशन पाउडर अशा नावांनी विकले जाणारे काही उत्पन्न आम्हाला मार्केटमध्ये आढळून आले. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ‘आईचं दूध हे सर्वोत्तम दूध’ ही सूचना लिहिणं बंधनकारक आहे. मात्र, हेच आम्हाला अनेक ठिकाणी आढळून आलं नाही. त्याचा परिणाम बालकांच्या आरोग्यावर होतो”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

“तसेच अन्न कोणत्या वयापासून द्यावं याच्याही सूचना शिशु आहार उत्पादनांवर आम्हाला आढळून आल्या नाहीत. मात्र, ते देणं देखील आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आपण आता ही ऑर्डर लागू करत आहोत. आता शिशु आहार उत्पादनांच्या पॅकेजवर ‘आईचं दूध सर्वोत्तम’ लिहिणं बंधनकारक असणार आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.