Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाने मागील काही दिवसांपासून राज्यभरात भेसळखोरांवर मोठ्या कारवाया केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईमुळे सध्या फूड विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अस्वच्छ पदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयाची कँटीन आणि हायकोर्टाच्या आवारातील कँटीनचीही एफडीएच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. यातच मंत्रालयातील कँटीन तपासणीच्या अहवालावरून उच्च न्यायालयाने एफडीएची कान उघाडणीही केली होती. या सर्व घडामोडींवर आता तुकाराम मुंढे यांनी प्रतिक्रिया देत नेमकं काय घडलं होतं? याचा खुलासा केला. तसेच ‘मंत्रालयाचं कँटीन असो वा हॉटेल, नियम सर्वांना सारखेच’, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
मंत्रालयाच्या कँटीनमध्ये एफडीएच्या पथकाने तपासणी केली होती. मात्र, त्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा चार वकिलांची टीम आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना मंत्रालयाच्या कँटीनमध्ये जाऊन तपासणी करण्यास सांगितलं. नेमकं काय घडलं होतं? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढेंनी सांगितलं की, “न्यायालयात सुनावणी सुरू होती एवढं मला माहिती होतं. मात्र, त्याबाबत सविस्तर माहिती मला आता नाही. पण सगळ्या डिटेल्स समोर आल्या की मी त्यावर बोलेन.”
“मंत्रालयाची कँटीन असो किंवा एखादं हॉटेल, माझ्यासाठी सगळ्यांना नियम सारखेच. मंत्रालयाची कँटीन दोन दिवसांपूर्वी तपासण्यात आली नव्हती, तर ८ ते १० दिवसांपूर्वी तपासण्यात आली होती. त्याचा स्कोअर काय असेल तो रेकॉर्डवर असतो. जर त्यामध्ये काही चुका असतील तर त्याप्रमाणे कारवाई होईल. न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
उच्च न्यायालयाने एफडीएची कान उघाडणी का केली?
न्यायालयाने कान उघाडणी केल्यानंतर एफडीएचे अधिकारी न्यायालयाची कँटीन तपासण्यासाठी गेले होते का? याबाबत बोलताना तुकाराम मुंढेंनी सांगितलं की, “असं नाहीये. न्यायालयानेच आधी सांगितलं होतं की, तुम्ही सरकारी कार्यालयाच्या कँटीन तपासता की नाही? त्याबाबत मला जीपींचा देखील फोन आला होता, ते मला बोलले की न्यायालयाचे आदेश आहेत की इकडच्याही कँटीन तपासा. त्यामुळे आम्ही न्यायालयातील कँटीनचीही तपासणी केली. खरं तर सरकारी कार्यालयातील कँटीन आम्ही आधीही अनेकदा तपासलेल्या होत्या, म्हणजे इकडच्या तपासायच्या आणि तिकडच्या तपासाच्या नाही असं काही नाही”, असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे.
“कोणीही असो, नियमानुसार काम केलं पाहिजे. नवी मुंबईतील एका हॉटेलवरील कारवाईच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने एफडीएचं कौतुक केलंय. हे मी न्यायालयाच्या ऑर्डरमधील माहिती तुम्हाला सांगतोय. आता न्यायालयात काय घडलं? हे मी सांगू शकत नाही. कारण तेथे मी नसतो. त्यामुळे एफडीएच्या कामकाजावर न्यायालयाने ताशेरे ओढले हे ऑर्डरमध्ये तरी नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
