Tukaram Mundhe FDA Action Navi Mumbai : नवी मुंबईत अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील मुदत संपल्याची तारीख बदलण्याचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये मॅगी आणि लेज यांसारख्या नामांकित ब्रँड्सचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती एफडीएने सोमवारी दिली. या कारवाईनंतर एफडीएने तुर्भे येथील टीटीसी इंडस्ट्रियल विभागात कार्यरत असलेल्या ‘साधना एंटरप्रायझेस’ या कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. मिंटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मुदत संपल्याच्या तारखा आणि फूड लेबल्समध्ये फेरफार

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये लेज, कुरकुरेचे विविध प्रकार, फन फ्लिप्स यांसारखे बटाटा चिप्स आणि स्नॅक्स, तसेच मॅगी मसाला आणि आटा नूडल्सचा समावेश आहे. याशिवाय रेडी-टू-ईट आणि रेडी-टू-कुक अन्नपदार्थही जप्त करण्यात आले आहेत. एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान ही संयुक्त कारवाई केली. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना आढळलं की, अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवर छापलेली उत्पादन तारीख आणि मुदत संपल्याची तारीख पुसून त्या जागी नवीन तारखा टाकल्या जात होत्या. तसंच, पदार्थांचे घटक आणि पौष्टिक मूल्यांची माहिती देणारी मूळ लेबल्स काढून त्या जागी नवीन स्टिकर्स लावले जात होते. हा सर्व साठा पुन्हा नव्याने पॅक केला जात असल्याचं विभागाने सांगितलं.

कारवाईवरून मुंबई उच्च न्यायालयात एफडीएला चपराक

दुसरीकडे, अंमलबजावणीच्या दोन प्रकरणांमध्ये महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने एफडीएच्या अवाजवी घाई आणि व्यावहारिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी लहरीपणाने केलेल्या कारवाईवर कडक शब्दांत टीका केली. वांद्रे-कुर्ला संकुल येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आवारातील पाच उपाहारगृहांची तपासणी केली असता, ती अन्न सुरक्षेच्या नियमांचे ८८ टक्के पालन करत असल्याचं आढळलं. त्यामुळे न्यायालयाने एफडीएला या रेस्टॉरंट्सचे कामकाज निलंबित करण्याचा आदेश मागे घेण्याचे निर्देश दिले आणि ही उपाहारगृहे पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली.

तसंच, एमसीएला नवीन नोटीस बजावून, रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या मेसर्स शिर्के इन्फ्रास्ट्रक्चरसोबतच्या कराराबाबत त्यांची सुनावणी घेण्याचे आदेश खंडपीठाने (कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम आंखड) एफडीएला दिले.