Tukaram Mundhe FDA : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभाग चांगलाच चर्चेत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी घेतल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी भेसळखोरांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. या धडक कारवायांमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. पण या दरम्यानच एफडीएच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध थेट मंत्री झिरवाळ यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली.

कामाचा ताण आणि मनुष्यबळाची कमतरता व पूर्वीप्रमाणे कार्यालयीन वेळ देण्याची मागणी करत सुट्या मिळत नसल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री झिरवाळ यांच्याकडे केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यावर आता तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच भाष्य करत नेमकं काय घडलं? कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांकडे तक्रार का केली? याचा खुलासा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना केला आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंत्री झिरवाळ यांच्याकडे तुमची तक्रार केल्याची चर्चा आहे. नेमकं काय घडलं? कर्मचाऱ्यांनी तक्रार का केली? यावर बोलताना तुकाराम मुंढेंनी सांगितलं की, “हो, ही तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांनी केली. त्यांनी ही तक्रार मंत्री झिरवाळ यांच्याकडे केली, त्यानंतर त्यांनी ती तक्रार माझ्याकडे पाठवली.”

“या कर्मचार्‍यांची तक्रार काय आहे? तर आम्हाला बाकीच्या ऑफिसच्या वेळेप्रमाणे ऑफिसची वेळ द्यावी. आता प्रयोगशाळा आणि ऑफिस या मधील फरक जर या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत समजला नसेल तर यात आमचीच चूक आहे असं म्हणावं लागेल. कारण लॅब २४ तास सुरू असतात, मग त्या शासनाच्या असो किंवा आणखी कोणत्या. लॅबमध्ये तीन शिफ्टमध्ये काम सुरू असतं. मात्र, याचा अर्थ सगळेच कर्मचारी सातही दिवस काम करतात असं नाही. प्रत्येकजण ६ दिवस काम करतो आणि आठवड्याला ४८ तास काम करत असतो. त्या पेक्षा जास्त कोणालाही काम दिलं जात नाही. फक्त एवढंच आहे की हे काम शिफ्टमध्ये करतात”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

“माझ्याआधी याच लॅब सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत चालत असायच्या. मात्र, त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या लॅबचे रिपोर्ट वेळेवर येत नाहीत अशा तक्रारी खूप येत होत्या. त्यानंतर मी आढावा घेतला, पण मला वेगवेगळी कारणं सांगण्यात आली. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की लॅबने लॅबसारखं काम करावं. आम्ही आमच्या विभागाच्या तिन्ही लॅबमध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरू केलं. सकाळी ७ ते १ आणि १ ते ९ अशा शिफ्ट सुरू केल्या. मुंबई आणि नागपूरमधील कर्मचाऱ्यांचं काम व्यवस्थित सुरू आहे. पण फक्त छत्रपती संभाजीनगर येथील कर्मचाऱ्यांनाच अडचण आली आणि त्यांनी तक्रार केली”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी सांगितली.

“छत्रपती संभाजीनगर येथील लॅबमधील काही कर्मचाऱ्यांनी तक्रार केली की आम्हाला सुट्ट्या दिल्या जात नाहीत. आता कायद्यानुसार, ८ तासांपेक्षा जास्त आणि आठवड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काम कोणालाही दिलं जात नाही. या नियमानुसार, या कर्मचाऱ्यांना एक मिनिट देखील जास्त काम दिलेलं नाही. पण सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत काम मिळण्याची त्यांची मागणी आहे. मात्र, ते शक्य होणार नाही. कारण ती लॅब आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.