Tukaram Mundhe FDA : गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धडक कारवाया सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी हाती घेतल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने बॉलिवूडच्या काही अभिनेत्यांनाही दणका दिला होता.
अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती आणि १५ दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. महाराष्ट्रात पान मसाल्याची निर्मिती करणं, साठवणं, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे. मात्र, असं असतानाही २०२४ मध्ये हे तिनही कलाकार पान मसाला कंपनीच्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत एकत्र दिसल्याचा आरोप करण्यात आला होता.
अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्यानंतर शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांनी या नोटिसांना काही उत्तर दिलं की नाही? किंवा याबाबत नेमकं काय खुलासा केला? याबाबत एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (२९ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे.
तुकाराम मुंढे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
अन्न व औषध प्रशासन विभागाने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना बजावलेल्या नोटिसांना काही उत्तर आलं का? याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना तुकाराम मुंडे यांनी सांगितलं की, “त्या नोटिसांच्या संदर्भात तिघांकडूनही उत्तरे आली आहेत. त्यापैकी दोघांनी सुनावणीची विनंती केली होती. त्यांची सुनावणी काल पूर्ण झाली आहे. आता आम्ही पुढील कार्यवाही करू.”
प्रकरण काय?
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाने अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ यांना पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यांनी तातडीने ‘विमल इलायची’ची जाहिरात करणं बंद करावं, तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल कंटेंट हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते. ११ ऑगस्टला ही नोटीस बजावण्यात आली होती आणि १५ दिवसांत या तिनही कलाकारांना उत्तर देण्यास सांगण्यात आलं होतं. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या म्हणण्यानुसार, ही जाहिरात ग्राहकांची दिशाभूल करू शकते आणि बंदी असलेल्या उत्पादनाच्या ब्रँडला प्रोत्साहन मिळू शकतं.
