गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक मोहीम उघडली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या राज्यव्यापी कारवाईत अवघ्या दोन दिवसांत ४ कोटी ४५ लाख रुपये किमतीचा संशयास्पद व भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बुलढाणा येथे टाकलेल्या धाडींमुळे भेसळदार अन्नाचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अहिल्यानगर: ३.९५ कोटींचे बटर सील
अहिल्यानगरमधील एमआयडीसी भागातील ‘अरिहंत कोल्ड स्टोरेज’वर एफडीएच्या पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईत हलक्या दर्जाचे आणि लेबलच्या नियमांचे उल्लंघन केलेले तब्बल ७५ हजार ३५६ किलो ‘पाश्चराईज्ड कुकिंग बटर’ जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या बटरची बाजारातील किंमत ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये आहे. या साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
पुण्यात पाठलाग करून ४३ लाखांचे पनीर आणि खवा जप्त
कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर, खवा आणि दही आणले जात असल्याची गुप्त माहिती एफडीएला मिळाली होती. प्रशासनाने लागोपाठ ५ दिवस पाळत ठेवून बुधवार पेठ परिसरात धाड टाकली.

- गाड्यांची झाडाझडती: ‘MH-12 QW-7011’ आणि ‘MH-12 WX-7011’ या दोन वाहनांतून अस्वच्छ, गंजलेल्या आणि विना-तापमान नियंत्रण व्यवस्थेतून पनीर व दह्याची वाहतूक केली जात होती. अनेक पिशव्यांवर उत्पादन तारीख, एक्स्पायरी डेट किंवा ‘बॅच नंबर’ नव्हता.
- खवा नष्ट: बुधवार पेठ येथील ‘के. बी. अगरवाल’ या पेढीतून ४ हजार ६२७ किलो बिनलेबलचा खवा जप्त करण्यात आला. हा खवा नाशवंत असल्याने हडपसर येथे तात्काळ नष्ट करण्यात आला.
- पुण्यातून एकूण १८ हजार ७० किलो (किंमत ₹४३.२७ लाख) साठा जप्त करत ६९ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नाशिक आणि बुलढाण्यातही कठोर कारवाई
- गुजरातहून येणारी बर्फी जप्त (नाशिक): गुजरातहून लक्झरी बसमधून अवैधपणे आणली जाणारी २ हजार १५५ किलो ‘स्पेशल स्वीट बर्फी’ नाशिकच्या द्वारका चौकात जप्त करण्यात आली. ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा हा साठा अस्वच्छ वातावरणात आणला जात असल्याने जागीच नष्ट करण्यात आला.
- विनापरवाना दुग्ध केंद्र (बुलढाणा): नांदुरा तालुक्यातील येरळी येथील ‘मराठवऱ्हाड दूध उत्पादक संस्थेच्या’ केंद्रावर धाड टाकण्यात आली. विनापरवाना व्यवसाय, अस्वच्छता आणि प्राथमिक चाचण्यांचा अभाव आढळल्याने गाईचे व म्हशीचे संशयास्पद दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही: तुकाराम मुंढे
“महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. मुदतबाह्य किंवा फेरफार केलेल्या अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरू राहील.”
— तुकाराम मुंढे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र)
तक्रार कुठे कराल?
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका किंवा भेसळीचा संशय आल्यास नागरिकांनी एफडीएच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा [https://complaints.mahafda.in](https://complaints.mahafda.in) या अधिकृत पोर्टलवर थेट तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
