Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक ठिकाणी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात कारवायांचा धडाका सुरू आहे. भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, हॉटेलवरील निकृष्ट दर्जाचं जेवण, गुटखा विक्रीवर छापे अशा अनेक कारवाया एफडीएकडून करण्यात येत आहेत. मात्र, एफडीएला छापा टाकण्यासाठी आधी माहिती कशी मिळते? कुठे छापा टाकायचा यासाठी तक्रारी कशा पद्धतीने येतात? त्यावर कार्यवाही कशा पद्धतीने केली जाते? याबाबत तुकाराम मुंढे यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.

तुकाराम मुंढेंनी काय सांगितलं?

तुम्ही कारवाई करत असताना टार्गेट कसं ठरवता? म्हणजे एखाद्या ठिकाणी छापा टाकायचा असेल तर त्याची माहिती कशी मिळते? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “आपण वेगवेगळ्या माध्यमातून कारवाई करत असतो. आता मी जेव्हा अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा मी आधी विभागाची भूमिका समजून घेतली. विभागाने काय करावं? याचा एक गोल ठरवून घेतला. त्यामध्ये आम्ही काही गोष्टी ठरवल्या.”

“एम्पॉवरमेंट कोणाची, तर नागरिकांचं सक्षमीकरण करणं, त्यासाठी एफडीएचं काम काय? हे लोकांना माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना एफडीएकडे कनेक्ट करण्यासाठी काम करणं, हे करत असताना एफडीएचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं. म्हणजे केलेल्या कारवाया लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आणि प्रेस नोटच्या माध्यमातून माहिती देत असतो. त्यामुळे आता लोकांनाही याबाबत समजायला लागलं आहे”, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

छापा कुठे टाकायचा याची माहिती कशी मिळते?

“दुसरं म्हणजे विश्वासार्ह व्यवसाय आहेत, त्यांना आपल्याला मदत करायची आहे. मात्र, जे चुकीच्या पद्धतीने काम करतात, त्यांच्यावर कारवाई होते आणि तिसरं म्हणजे एन्फोर्समेंट म्हणजे अंमलबजावणी करणं. आता ही झाली आमची स्ट्रॅटेजी. पण आम्हाला कारवाई करण्यासाठी त्याची आधी माहिती कशी मिळते तर आमच्याकडे तक्रारी येतात. त्यासाठी आम्ही टोल फ्री नंबर ठेवलेले आहेत. टोल फ्री नंबर आम्ही सक्रिय ठेवलेले आहेत. तसेच आम्ही ईमेल देखील दिले होते, म्हणजे काही तक्रारी असतील तर ईमेल करा. तसेच आणखी एक महत्वाचं म्हणजे आम्ही एक पोर्टल देखील सुरू केलं. त्या पोर्टलवर नागरिकांना तक्रारी करता येतात. जेव्हा पोर्टलवर तक्रार येतात, त्या लगेच आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना असाईन होतात आणि त्यानुसार कारवाई होते. तसेच आमच्याकडे इंटेलिजेंस ब्रांचच्या माध्यमातून देखील माहिती येत असते”, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी सांगितली.

कारवाई थांबवण्यासाठी कधी राजकीय दबाव येतो का?

हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर कारवाई करत असताना कधी राजकीय दबाव येतो का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “सिस्टम आहे आणि सिस्टममध्ये प्रेशर असतात. मात्र, त्यामध्ये काम करण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. कुठेही काम करत असताना प्रेशर नाही असं होत नाही. पण म्हणून त्याचा बागुलबुवा करायचा का हे आपल्यावर असतं. माझी सवय प्रतिसाद देण्याची आहे, लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याची नाही. मी कदाचित रिअ‍ॅक्शन लगेच देत नाही. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मला एकाही कारवाईच्या बाबतीत, म्हणजे कारवाई करा किंवा कारवाई करू नका, असा कोणाचा मेसेज किंवा फोन देखील आलेला नाही. कोणाचाही फोन आलेला नाही”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.