Tukaram Mundhe FDA : अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मागील काही दिवसांपासून भेसळखोरांवर होत असलेल्या कारवायांची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून अनेक ठिकाणी कारवायांचा धडाका सुरू आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे चांगलेच चर्चेत आहेत. भेसळखोरांवर करण्यात येत असलेल्या कारवायांबाबत आता तुकाराम मुंढे यांनी भूमिका मांडली आहे.

तसेच सेवन करण्यामध्ये दारू देखील येते. पण मग फक्त खाद्यपदार्थांवरच कारवाया का? यावर बोलताना आता तुकाराम मुंढे यांनी मोठा इशारा दिला आहे. तसेच तुकाराम मुंढे यांनी आणखी एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. एफडीएच्या टोल फ्री नंबरवर आलेल्या एका फोनचा किस्सा तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित मुलाखतीत बोलताना सांगितला.

फक्त खाद्यपदार्थांवर कारवाया का?

सेवन करण्यामध्ये दारू देखील येते. मग तुम्ही फक्त खाद्य पदार्थांवरच कारवाया का करता? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “दोन्ही ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोल ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स या दोन्हीही माझ्या अधिकारात येतात. त्याची कॉलिटी, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं लेबलिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते देखील एफडीएच्या अधिकारात येतात. आता ते देखील लाईनमध्ये आहे. सध्या जरा जास्त काम आहे. मात्र, त्यासाठी देखील काही प्लॅन केलेले आहेत”, असा सूचक इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

तुकाराम मुंढेंनी काय किस्सा सांगितला?

“जेव्हा मी एफडीएमध्ये काम सुरू केलं, तेव्हा आम्ही लोकांच्या तक्रारींसाठी एक टोल फ्री नंबर सुरू केला. मग ज्यांच्या काही तक्रारी असतात ते त्यावर तक्रारी करतात. पण ८ ते १० दिवसांनंतर जे कर्मचारी हा टोल फ्री नंबर अटेंड करतात, त्यातील काही कर्मचारी माझ्याकडे आले. त्यांना म्हटलं की बोला काय अडचण आहे? तर ते बोलले की आम्हाला रात्रीऐवजी दिवसांची शिफ्ट मिळेल का? मग मी विचारलं की काय झालं? तर ते बोलले की रात्री जास्त त्रास होतो. मी म्हटलं की उलट दिवसांपेक्षा रात्री कमी फोन येत असतील. मग ते बोलले की तसं नाहीये. पण विचित्र फोन येतात. रात्री ११, १२ च्या दरम्यान फोन येतात आणि म्हणतात की तुकाराम मुंढे यांचा फोन नंबर द्या. मग हे कर्मचारी सांगतात की त्यांचा फोननंबर आमच्याकडे नाही. पण तुमची तक्रार असेल तर ती सांगा. पण फोनवर बोलणारा तरी काही ऐकत नाही. मग शेवटी तो व्यक्ती म्हणतो की तुमची टीम या ठिकाणी पाठवा. मग आमचे कर्मचारी म्हणाले की कुठे पाठवयाची. मग तो म्हणतो की मी सध्या ड्रिंक करतोय, पण या ड्रिंकची टेस्टच बरोबर नाहीये. आता हे असं खरोखर घडलेलं आहे”, असा किस्सा तुकाराम मुंढेंनी सांगितला आहे.