Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात मोठ्या कारवायांचा धडाका सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात जोरदार धडक मोहीम सुरू केलेली आहे. आतापर्यंत भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात अनेक कारवाया एफडीएकडून (FDA) करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांची फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या कामाचं राजकीय नेते मंडळी, सेलिब्रिटी, खेळाडू, उद्योगपती ते सामान्य व्यक्ती अशा सर्वांकडून कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी एका महत्वाच्या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागामधून बदली झाल्यानंतर पुढे कोणत्या विभागात काम करायला आवडेल? यावर तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदाच महत्वाचं भाष्य केलं आहे. ते न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
अन्न व औषध प्रशासन विभागामधून तुमची बदली झाल्यानंतर तुम्हाला पुढे कोणत्या विभागात काम करायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “आता ते माझ्या हातात नाहीये. ते सरकार ठरवेल. सरकार ठरवेल त्या विभागात मी काम करेन एवढंच माझ्या हातात आहे.”
देशभरात काम करायला आवडेल का?
आता तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात. मात्र, महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशभरात तुम्हाला काम करायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “मी भविष्याचा खूप विचार करत नाही. त्यामुळे सध्या जिथे पद आहे, जेथे आपली भूमिका आहे, ती भूमिका पार पाडण्याची जबाबदारी मी पार पाडत असतो. ही भूमिका पार पाडत असताना चांगल्या प्रकारे कशी पार पाडता येईल या अनुषंगाने आपण प्रयत्न करत राहायचं असतं. पुढचा जास्त विचार करायचा नाही. वर्तमानात राहायला शिकायचं”, असं तुकाराम मुंढे म्हणाले आहेत.
तुकाराम मुंढेंचा स्वतःच्याच अधिकाऱ्यांना मोठा इशारा
कामचुकार किंवा कारवाई दरम्यान तडजोड करणाऱ्या एफडीएच्या अधिकाऱ्यांवरही काही दिवसांत कारवाईची टांगती तलवार असू शकते का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “काही दिवसांत म्हणण्यापेक्षा कधीही. जर कोणी कामचुकारपणा करत असेल किंवा कोणी काही तडजोड करताना दिसत असेल तर त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवण्याचं काही करण नाही. चुकीचं काम करणं किंवा योग्य काम न करणं या दोन्हीमध्येही कारवाई होऊ शकते”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
