विमल पान मसाला जाहिरात प्रकरणानं पुन्हा एकदा मोठं वळण घेतलं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठी माहिती दिली आहे. या प्रकरणात नाव असलेल्यांपैकी अभिनेता अजय देवगण याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असली, तरी एफडीए आपली कायदेशीर कारवाई थांबवणार नसून ती अधिक तीव्र गतीने पुढे नेणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.

पान मसाला जाहिरातींशी संबंधित वादावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, “आम्ही या प्रकरणात तत्परतेने कारवाई सुरू केली असून संबंधित तिन्ही व्यक्तींना आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या तिघांनीही नोटिसांना उत्तर देऊन एफडीकडे काही वेळाची मुदत मागितली होती.”

कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात

एफडीएच्या प्रशासकीय प्रक्रियेची माहिती देताना आयुक्तांनी सांगितेले की, या प्रकरणात सक्षम अधिकारी असलेल्या साहाय्यक आयुक्तांनी सर्व कायदेशीर सुनावण्या पूर्ण करून या प्रकरणाची सुनावणी बंद केली आहे. आता पुढील ठोस निर्णयासाठी आणि दंडात्मक कारवाईसाठी हे संपूर्ण प्रकरण सहआयुक्तांकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, या कारवाईविरोधात अभिनेता अजय देवगण याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, न्यायालयीन याचिका प्रलंबित असली तरी एफडीएकडून नियमानुसार योग्य ती पुढील प्रक्रिया आणि सुनावणी निष्पक्षपणे सुरूच राहील, असा ठाम विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

अन्न व्यावसायिकांना तुकाराम मुंढेंचा स्पष्ट संदेश

“राज्यात अन्न सुरक्षा कायदे अधिक पारदर्शक आणि कडक करण्यासाठी आम्ही १५ महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. नियम काय आहेत, व्यावसायिकांनी काय केले पाहिजे आणि नागरिकांचे हक्क काय आहेत, याची स्पष्टता यातून मिळेल. नियम न पाळणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.