Tukaram Mundhe on Paan Masala Advt : राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रचंड धास्ती आहे. विविध खाद्यनिर्मिती आणि विक्री आस्थापने तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आहेत. अनेक प्रसिद्ध हॉटेलांवर कारवाई करून बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक आस्थापनांनी आता स्वच्छता ठेवायला सुरुवात केली असून पेस्ट कंट्रोल करत आहेत. आता तुकाराम मुंढे यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. पान मसालाच्या जाहिराती करणं बेकायदेशीर असून अशा जाहिराती करणारे अभिनेते आणि अभिनेत्री शिक्षेस पात्र असल्याचं तुकाराम मुंढे म्हणाले. फूड फार्मर या युट्यूब चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
तर कलाकार शिक्षेस पात्र
बॉलिवूडमधील अनेक कलाकार पान मसाला आणि गुटख्यांच्या जाहिराती करतात. अशा जाहिराती करणं बेकायदेशीर असल्याचं तुकाराम मुंढे म्हणाले. “दिशाभूल करणाऱ्या जाहिराती या बेकायदेशीर आहेत. पान मसाले किंवा गुटखा हे अवैध आहेतच. पण त्याचं ब्रॅण्डिंगही बेकायदेशीर आहे. तसंच, अशा उत्पादनांची जाहिराती करणंही बेकायेदशीर असतं. त्यामुळे जे अभिनेता किंवा अभिनेत्री जर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करत असतील. तर ते बेकायदेशीर आहे. तसंच, शिक्षेस पात्र आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
“आम्ही यावर काम करत आहोत. FSSAI ही यावर काम करत आहे. येत्या काही काळात यावरही कारवाई करण्यात येणार आहे. अशा उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर फक्त कारवाई होणार नाही तर त्याची जाहिरात करणाऱ्यांवरही करावाई होणार आहे”, असं म्हणत तुकाराम मुंढे यांनी टीव्हीवरील सर्वच जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही उत्पादनावरील इंडिग्रेट्स वाचूनच ते उत्पादन खरेदी करायचं की नाही हे ठरवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
“तुम्ही उत्पादनावरील साहित्य न वाचताच ते खरेदी करत असाल आणि त्याचं रोज सेवन करत असाल तर तो आपल्या आरोग्याविरोधातील गुन्हा आहे”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
