FDA Commissioner Maharashtra / मुंबई : ‘मिस्टर क्लीन’ म्हणून ओळख असलेले अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता राज्यातील मिथेनॉल उत्पादक कंपन्यांकडे मोर्चा वळवला आहे. मिथेनॉल हातभट्टीमध्ये विक्री करण्यासाठी राज्यात मुक्तपणे विक्री होवू लागल्याने मुंढे यांनी मिथेनॉल उत्पादकांच्या झाडाझडतीला प्रारंभ केल्याने बड्या कंपन्या धास्तावल्या आहेत.

दारुमध्ये इथेनॉल (Methnol) असते. मात्र ते जिवीतास विशेष हानीकारक नाही. मिथेनॉल आणि इथेनॉल सारखे दिसतात. मिथेनाॅल हे विषारी द्रव्य असून ते औषधे, रंग, सौंदर्य प्रसाधने, रॉकेट इंधन आदींसाठी वापरले जाते. महाराष्ट्रात ८३७ मिथेनॉल उत्पादक कंपन्या आहेत. महाराष्ट्र विष कायदा १९७२ नुसार मिथेनॉलचा साठा, विक्री यासंदर्भात सुनिश्चित पद्धती (SOP) आहे. मात्र त्याला हारताळ फासत मिथेनॉलची राज्यात ऑनलाईन विक्री होत होती. त्यातून नुकतेच पुणे जिल्ह्यात विषारी दारु दुर्घटना घडून २४ बळी गेले आहेत.

मिथेनॉलचे नियंत्रण अन्न व औषध प्रशासनाच्या हाती आहे. हातभट्टीचे नियंत्रण उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. मिथेनॉल मध्ये रंग आणि कडू चव मिसळावी यासाठी १९९३ मध्ये पार्थसारथी समितीने शिफारसी केल्या होत्या. २०११ मध्ये त्यासंदर्भात अधिसूचना जारी झाली. मात्र रासायनिक कंपन्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यावर स्थगिती मिळवली. २०१९ मध्ये यासंदर्भात निकाल आला आणि मुंबई उच्च न्यायालयाने रंगीत मिथेनॉल विक्रीचे आदेश दिले. मात्र, कंपन्यांनी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती मिळवली आहे.

पुणे विषारी दारु दुर्घटनेनंतर मिथेनॉलचा वाद पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांनी मिथेनॉल उत्पादक कंपन्या या मिथेनॉल साठा व विक्रीची एसओपी पाळतात का नाही, याची झाडाझडती सुरु केली आहे. मिथेनॉल उत्पादक कंपन्यांची अवाढव्य उलाढाल असून या कंपन्या मिथेनॉलची निर्यातही करतात. मुंढे यांनी तपासणी सुरु केल्याने या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिथेनॉल विक्रीची एसओपी

  • १. मिथेनॉल उत्पादनास परवाना आवश्यक, दरवर्षी नुतनीकरण गरजेचे.
  • २. मिथेनॉल विक्री ही बी. फार्म, डी. फार्म असलेल्या प्रतिनिधी द्वारे करता येते.
  • ३. मिथेनॉल खरेदीचा ज्याच्याकडे परवाना आहे, त्यांना विक्री करता येते.
  • ४. एका व्यक्तीला प्रमाणापेक्षा अधिक मिथेनॉल विक्री करता येत नाही.
  • ५. विक्रीचे रजिस्टर उत्पादक कंपन्यांना ठेवणे बंधनकारक आहे.
  • ६. मिथेनॉल विक्री, परवाने, खरेदी आदेश याच्या नोंदी २ वर्षे जपून ठेवणे बंधनकारक आहे.

मिथेनॉलमुळे झालेल्या विषारी दारु दुर्घटना

  • १. १९६८ मध्ये खोपोली, रायगड जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक बळी गेले.
  • २. १९९१ मध्ये मुंबईतील ताडदेवच्या छाया बार दुर्घटनेत ९१ बळी गेले.
  • ३. २००४ मध्ये सातरास्ता, विक्रोळी दुर्घटनेत १०४ बळी गेले.
  • ४. २००९ मध्ये पाली, रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेत १० बळी गेले.
  • ५. २०१५ मध्ये मुंबईच्या मालवणीमध्ये दुर्घटनेत १०४ बळी गेले.
  • ६. २०१७ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात पांगरमल येथील दुर्घटनेत ९ बळी गेले.
  • ७. २०२६ मध्ये पुणे शहरातील दुर्घटनेत २४ बळी गेले आहेत.

१५ दिवसात तपासणी

राज्यात ‘महाराष्ट्र विष कायदा १९७२’ आहे. त्यानुसार मिथेनॉल विक्री करण्याची ‘एसओपी’ आहे. त्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. राज्यात मिथेनॉलच्या ८३७ कंपन्या आहेत. त्या सर्वांची अन्न व औषध प्रशासनाचे निरिक्षक पुढील १५ दिवसांमध्ये तपासणी करतील. ज्यांची अनियमितता आढळेल त्यांचे परवाने निलंबित होतील. – तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.