आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. FDA आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी राज्यभरातील भेसळखोर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि दुग्ध व्यवसाय केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी ‘एनडीटीव्ही प्रॉफिट’ला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत एफडीएच्या कारवाईचे जोरदार समर्थन करतानाच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि स्वभावाबद्दल विचारलेल्या रंजक प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.

अधिकारी की मुलं? मुंढेंना कोण जास्त घाबरतं?

“तुम्हाला नक्की कोण जास्त घाबरतं…अधिकारी की तुमची मुलं?” यावर मुंढेंनी हसत उत्तर दिले, “माझ्या विभागात काम करणारे अधिकारी मला घाबरतात, पण घरात मात्र परिस्थिती उलटी आहे; मीच माझ्या मुलांना घाबरतो!”

“बायको की बदली? नक्की कशाला घाबरता?”

मुलाखतीदरम्यान निवेदकाने तुकाराम मुंढेंना प्रश्न विचारला, “तुकाराम मुंढे नेमके कशाला जास्त घाबरतात? बायकोला की वारंवार होणाऱ्या बदलीला?” यावर आपल्या नेहमीच्या स्वभावाला साजेसे उत्तर देत मुंढे म्हणाले, “मी दोघांनाही घाबरत नाही!” त्यांच्या या उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

“भीती फक्त एकाच गोष्टीची वाटली पाहिजे…”

मुलाखती दरम्यान जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, राजकारणी की बदली… यापैकी सर्वात जास्त भीती कशाची वाटते? तेव्हा त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विचार मांडला.

“मला कशाचीही भीती वाटत नाही. भीती ही खरं तर तुमच्या डोक्यात असते. माणूस म्हणून तुम्हाला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटली पाहिजे—ती म्हणजे काहीतरी चुकीचं काम करण्याची! जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि काम योग्य करत असाल, तर कुणालाही घाबरण्याचं कारण नाही.”

महाराष्ट्रातील अन्न सुरक्षेचा दर्जा उंचावण्यासाठी एफडीएतर्फे सुरू असलेल्या मोहिमेवर ते पूर्णपणे ठाम असून, कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय अडथळे आपल्याला रोखू शकत नाहीत, हेच तुकाराम मुंढेंनी या मुलाखतीतून पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

तुकाराम मुंढे यांना ‘नायक’ किंवा ‘सिंघम’ म्हटलेलं आवडतं का?

“मला ‘नायक’ किंवा ‘सिंघम’ म्हटलेलं अजिबात आवडत नाही. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, मी फक्त एक लोकसेवक आहे. आपल्याला ही सवयच झाली आहे की, एखाद्या कामासाठी आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो. मराठीत असे म्हणतात की, ‘शिवाजी जन्मावा, पण दुसऱ्याच्या घरी.’ मूळ मुद्दा म्हणजे आपला दृष्टिकोनच चुकीचा आहे. आपण बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी.”

कलाकारांनी केलेल्या गुटख्याच्या जाहिरातींवर मुंढे काय म्हणाले?

“जर तुम्ही एखाद्या पदार्थाची जाहिरात करता, तर त्याचा उपभोग घ्यायला आधी स्वतःपासूनच सुरुवात करा. तुम्ही गुटख्याची जाहिरात करत असाल, तर तुम्ही तो पहिले स्वतः खा, तुमच्या मुलाबाळांना खायला घाला. हे खूप चुकीचं आहे. तुम्ही दाखवता वेगळं आणि वागता वेगळं; हे अनैतिक आहे,” असेही मुंढे म्हणाले.