महाराष्ट्रातील सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचा डंका फक्त महाराष्ट्रभरच नव्हे, तर देशभर आणि आता विदेशातही वाजू लागला आहे. आधी ‘बीबीसी’ आणि आता प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने तुकाराम मुंढे यांच्या कामाला दाद देत त्यांची विशेष दखल घेतली आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर मुंढे यांचा उल्लेख ‘रॉक स्टार’ असा केला आहे.
तथापि, या आंतरराष्ट्रीय कौतुकावर प्रतिक्रिया देताना अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “फक्त बातम्यांमध्ये येणं म्हणजे चांगलं प्रशासन नव्हे, तर लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते असते,” असे त्यांनी सांगितले. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
न्यू यॉर्क टाइम्स आणि बीबीसीकडून विशेष दखल
‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या लेखात तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीचे कौतुक करताना “In India, a Food Safety Inspector Is a Rock Star” (भारतात अन्न सुरक्षा अधिकारी ठरतोय ‘रॉक स्टार’) असा मथळा दिला होता. त्यापाठोपाठ प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या बातमीत “Diners Turn Safety Chief Into Food God In Indian City” असा उल्लेख करत हॉटेल आणि अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात त्यांनी आणलेल्या शिस्तीवर प्रकाश टाकला.
याआधी २७ सप्टेंबर रोजी ब्रिटनच्या ‘बीबीसी’नेही (BBC) तुकाराम मुंढे यांच्यावर विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. “आपली कर्तव्ये पार पाडताना भारतातील काही प्रशासकीय अधिकारी हिरो का ठरतात?” असा सवाल करत बीबीसीने मुंढे यांच्या कार्यशैलीचे विश्लेषण केले होते.
‘X’ वर काय म्हणाले तुकाराम मुंढे?
आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील या वृत्तांचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करत तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय सेवेमागची आपली भूमिका मांडली:
“अन्न सुरक्षेचा थेट संबंध लोकांचे आरोग्य जपण्याशी, नियमांचे पालन करण्याशी आणि जनतेचा विश्वास जिंकण्याशी असतो. जेव्हा कायद्याची अंमलबजावणी निष्पक्ष, निर्भय आणि सातत्यपूर्ण असते, तेव्हाच शासकीय संस्थांवर लोकांचा विश्वास बसतो आणि ही यंत्रणा आपल्यासाठी काम करतेय, याची खात्री नागरिकांना पटते.”
“व्यक्तीपेक्षा संस्था आणि व्यवस्था महत्त्वाची”
नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी प्रसिद्धीपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देण्याचा संदेश दिला आहे.
“सार्वजनिक आयुष्यात लोक बऱ्याचदा बदल घडवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करतात. पण खरा उद्देश असा असावा की, आपण अशा भक्कम संस्था उभ्या केल्या पाहिजेत, ज्या दररोज लोकांच्या हितासाठी काम करतील. हेच खरे नेतृत्व आहे. नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार गाजवणे, प्रसिद्धी मिळवणे किंवा स्वतःची ओळख निर्माण करणे नव्हे, तर लोकहित साध्य करणे होय,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात मोठ्या शहरांपासून गावांमध्येदेखील तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील FDA नं छापे टाकून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या आणि पुरेशी स्वच्छता न बाळगणाऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचा डंका फक्त महाराष्ट्रभरच नव्हे, तर देशभर आणि आता विदेशातही वाजू लागला आहे.
