तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवायांचा सपाटा लावला आहे. आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने सनदी वर्तुळात वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. “लोकसेवा ही प्रसिद्धी मिळवण्याचे माध्यम नसून ती एक जबाबदारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासकीय कामकाजाचे मूळ सूत्र अधोरेखित केले आहे.

तुकाराम मुंढे यांनी बड्या राजकीय नेत्यांना मागे टाकत सोशल मीडियावरील लोकप्रियतेत आघाडी घेतली आहे. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्याचेच प्रतिबिंब आता सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. मुंढेंनी फॉलोअर्सच्या संख्येत आता मुख्य नेत्यांनाही मागे टाकले आहे. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या संख्येत आणि एंगेजमेंट रेटमध्ये त्यांनी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात दिली आहे.

याच बातम्यांचा संदर्भ देत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर व्यक्त होताना तुकाराम मुंढे यांनी सुशासनाचा खरा अर्थ सांगितला आहे. प्रसिद्धी आणि सोशल मीडियावरील कौतुकापेक्षा जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास अधिक महत्त्वाचा असतो, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.

तुकाराम मुंढे पोस्टमध्ये काय म्हणाले?

“लोकसेवा म्हणजे प्रसिद्धीचा शोध नव्हे, तर ती एक कर्तव्य आणि जबाबदारीची वचनबद्धता आहे. सोशल मीडिया किंवा प्रसिद्धीमुळे एखाद्या कामाकडे लोकांचे लक्ष वेधले जाऊ शकते; मात्र या गोष्टी चांगल्या प्रशासनाचा एकमेव निकष ठरू शकत नाहीत. नागरिक स्वतःला किती सुरक्षित मानतात, प्रशासकीय संस्था किती उत्तरदायी बनतात आणि कठीण प्रसंगात व्यवस्था योग्य बाजूने उभी राहील असा विश्वास लोकांना वाटतो का, यावरूनच सुप्रशासनाचे खरे मूल्य ठरते. अधिकारी येतात आणि जातात, परंतु जनतेचा विश्वास संपादन करणारी मजबूत संस्थात्मक व्यवस्था कायम टिकून राहिली पाहिजे.”

“माझ्यासाठी प्रशासनाचा अंतिम उद्देश हा व्यक्ति केंद्रित नसून संस्था मजबूत करणे आणि जनहित जपणे हाच आहे. अधिकारी बदलतात, पण विश्वासार्ह संस्था नेहमी कायम राहिल्या पाहिजेत.”
— तुकाराम मुंढे (IAS)