महाराष्ट्रातल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची धडाडी याच्या चर्चा नेहमीच होत असतात. तसंच त्यांच्या आजवर अनेकदा बदल्याही झाल्या आहेत. FDA आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतल्यापासूनच तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात छापेमारी सुरू केली. सर्वात आधी हॉटेल्समधील अस्वच्छता, त्यानंतर भेसळयुक्त पनीर आणि त्यानंतर भेसळयुक्त दूध यांवर धडक कारवाया करण्यात आल्या. आपल्या धडड कारवायांच्या सत्रांमुळे मुंढे चर्चेत आले आणि अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. अशातच तुकाराम मुंढे यांची एक प्रकट मुलाखत घेण्यात आलीय. प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढे यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी तुमची आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारला. जो किस्सा तुकाराम मुंढेंनी सांगितला तो ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी त्यांनी मित्राचाही एक किस्सा सांगितला.
तुकाराम मुंढेंनी सांगितलेला मित्राचा किस्सा काय?
अन्न आणि प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे बोलताना म्हणाले की, “मला ते वर्ष नीट आठवत नाही… पण १९९८ किंवा ९९ चा काळ असेल… तेव्हा मी मेन्सचा अभ्यास करत होतो आणि पॅरासाईट म्हणून राहत होतो. तेव्हा आमची एक सवय होती, प्रत्येकाचं अभ्यास करायला बसायचं एक ठिकाण ठरलेलं असायचं, माझा एक मित्र होता, आता त्याचं नाव सांगू की नको, असाही प्रश्न आहेच… कारण ते वहिनींनी ऐकलं तर प्रॉब्लेम व्हायचा. पंकज म्हणून माझा मित्र आहे, तो आता कस्टममध्ये कमिशनर आहे.” असं म्हणत मित्राचा किस्सा तुकाराम मुंढेंनी सांगितला.
पंकज आला आणि रडू लागला..
पुढे मुंढे म्हणाले, “आम्ही दोघंही उशिरापर्यंत अभ्यास करायचो, तो माझ्यापेक्षा एक दोन तास उशिरा झोपायचा… मी रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत झोपायचो, तो साधारण तीन-चार वाजता झोपायचा आणि थोडं उशिरा उठायचा… मी सकाळी उठल्यावर पुन्हा अभ्यासाला बसायचो. मी रुम आणि लायब्ररीच्या कॉरीडॉरमध्ये अभ्यास करायचो. तेव्हा साधारण, दहा साडेदहा वाजले असतील… तेव्हा पंकज पाठीमागून आला, त्यानं माझ्या गळ्यात हात घातला आणि रडू लागला… त्याला रडताना पाहून मला शॉक बसला, मी त्याला विचारलं काय झालं? पण तो रडत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होतं की नाही माहीत नाही, पण तो तसा आवाज काढत होता…”, असं तुकाराम मुंढे म्हणाले. “मी त्याला विचारलं काय झालं, मला भीती वाटायला लागली की, याला काय झालं, मी अभ्यासात गुंग असताना अचानक तो काहीतरी सांगत होता. मग तो मला म्हणाला पेपर वाचला का? मग मी वाचून बघितला, तेव्हा मला त्यात काही दिसलं नाही, त्यामुळे मी त्याला पुन्हा विचारलं काय झालं? का रडतो? तेव्हा तो म्हणाला, अरे माधुरीचं लग्न झालं… मग मी म्हटलं मग काय झालं? मग तो म्हणाला, माधुरी दीक्षित… असे प्रसंग आमच्यात घडलेत. हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
आवडती अभिनेत्री कोण? यावर काय म्हणाले तुकाराम मुंढे?
यानंतर तुमची आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न अरविंद जगताप यांनी विचारला त्यावर “हे सांगायची डेरींग मी सध्या करणार नाही. माझा व्यवस्थित संसार सुरू आहे…”, असं तुकाराम मुंढे म्हणाले. त्यांच्या या उत्तरामुळेही मुलाखतीला उपस्थित असलेले सगळेच खळखळून हसले.
