Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांची राज्यात मोठी चर्चा आहे. कारण गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळखोरांवर धडक कारवाया करण्यात आल्यामुळे भेसळखोरांचेही धाबे दणाणले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या कामाचं राज्यभरातून मोठं कौतुक केलं जात आहे.
या दरम्यानच तुकाराम मुंढे यांनी एका महत्वाच्या प्रश्नावर बोलताना मोठा खुलासा केला आहे. तुकाराम मुंढे भविष्यात राजकारणात येतील का? किंवा भविष्यात राजकारणात जाण्याचा त्यांचा काही विचार आहे का? किंवा त्यांना राजकारणात येण्याची ऑफर मिळाली तर काय? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी लोकमतच्या मुलाखतीत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
चांगल्या व्यक्तीने राजकारणात जावं असं बोललं जातं. तसं तुमचा कधी राजकारणात जाण्याचा योग येऊ शकतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “कदाचित नाही आणि कदापिही नाही, कदापिही नाही”, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.
जर लोकांनी मागणी केली की तुम्ही बीडमधून निवडणुकीसाठी उभे राहा आणि लोकसभेवर जा तर? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “लोकांनी मागणी करणं त्यांचा हक्क आहे. पण त्यावर निर्णय काय घ्यायचा हा माझा हक्क आहे. त्यामुळे माझ्या मर्यादा मला माहिती आहेत”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
ठाकरे, शिंदे की फडणवीस? कोणते मुख्यमंत्री जास्त चांगले वाटतात?
आपण मागचे तीन, चार मुख्यमंत्री पाहिले, तर त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा आता देवेंद्र फडणवीस असतील. या सर्वांच्या कार्यकाळात तुम्हाला किमान एकूण अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग दिली गेली नव्हती. मग उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी कोणते मुख्यमंत्री तुम्हाला जास्त चांगले वाटतात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो”, अशी मिश्किल प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.
“तुम्ही विचारल्यामुळे मलाही आता ते चेक करावं लागेल की खरंच एकूण अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग दिली गेली होती की नव्हती. कदाचित असेलही. मला आता माहिती नाही. कारण मी कधी असा कार्यकाळ मोजला नाही. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे हा विषय चर्चेचा नाही. पण आता हा विषय निघाला म्हणून बोलतो. माझ्या पहिल्या पोस्टिंगवेळीच मी वेटिंगवर होतो. तेव्हा मी वेटिंगवर का होतो? का नाही? हे मलाही माहिती नाही. मात्र, पोस्टिंगसाठी कुठेही वेटिंगवर राहणं हे सरकारसाठी देखील आणि अधिकाऱ्यांसाठी देखील चांगलं नसतं”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं.
