Tukaram Mundhe on milk adulteration and fake paneer: दुधात वेगवेगळ्या पद्धतीने भेसळ केली जाते आणि ही भेसळ नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात भेसळीविरोधात कारवाई मोहीम सुरु केली आहे. पण, राज्यात दुधात भेसळ कशा पद्धतीने केली जाते? याबाबतची माहिती मुंढे यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. दुधात होणारी भेसळ आरोग्यासाठी अतिशय घातक असल्याचे सांगत नागिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज मुंढेंनी व्यक्त केली.
दुधात भेसळ कशी केली जाते?
“दूध तयार करण्यासाठी तथाकथित एक फॉर्म्युला बनवला आहे. त्यात पाम तेल किंवा इतर तेलाचा वापर करण्यात आला आहे, किंवा काही रासायनिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. स्किम्ड मिल्क पावडरचा वापर करण्यात आला आहे. या मिश्रणाचा वापर करुन दूध तयार करण्यात आले आहे. अशा पद्धतीने गायीचे दूध तयार करण्यासाठी १५ रुपये प्रतिलिटर खर्च येतो तर, म्हैशीच्या दुधासाठी साधारण ३० रुपयांचा खर्च येतो. काही ठिकाणी या दुधात शॅम्पू वापरल्याचे आढळून आले तर काही ठिकाणी साबण आणि डिटर्जंटचा देखील वापर केल्याचे आढळून आले”, असे तुकाराम मुंढे ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले.
कृती दहशतवादी कृती इतकीच घातक – तुकाराम मुंढे
“अशा पद्धतीने तयार करण्यात येणारे दूध कृत्रिम दूध असून, ते विषारी आहे”, असेही मुंढे पुढे बोलताना म्हणाले. “ही रॅकेट पकडण्याचे काम आम्ही केलं आहे आणि त्याची पाळेमुळे शोधण्याचे काम सुरु आहे. नफा कमविण्यासाठी गायीचे साधे दूध आणि कृत्रिम पद्धतीने तयार केलेले दूध मिक्स करुन बाजारात विकले जाते. ही कृती दहशतवादी कृती इतकीच घातक आहे”, असे तुकाराम मुंढे म्हणाले. “दूध संकलन केंद्रावर सुरुवातीला दुधाची तपासणी होणे अपेक्षित आहे, त्यानंतर चिलिंग सेंटर किंवा वितरण केंद्रातही त्याची तपासणी होणे अपेक्षित आहे”, असे मुंढे म्हणाले.
दूध खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?
“दूध खरेदी करताना त्याच्या ब्रँडवर न जाता त्यात कोणते घटक आहेत याची तपासणी करा, पाकिटावर लिहण्यात आलेल्या गोष्टी व्यवस्थित वाचून घ्या, हे बेसिक आहे”, असे मुंढे म्हणाले. “दुधावर साय जास्त आली म्हणजे दूध चांगलं हा समज योग्य नाही, कदाचित युरियामुळे साय येत असेल, त्यामुळे या गोष्टी तपासून घेणे आवश्यक आहे”, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. “पाणी मिसळले तर दूधाचा दर्जा ढासळतो, फॅट वाढण्यासाठी साखर मिक्स करणे किंवा इतर गोष्टी करणे आता चालणार नाही. असुरक्षित अन्न असेल तर त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे, तसा खटला लढणे आवश्यक आहे”, असेही मुंढेंनी पुढे सांगितले.
पनीरमध्येही मोठी भेसळ
पनीरच्याबाबतीतही सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. “एक किलो पनीरसाठी पाच ते सहा लिटर दूध लागते. समजा बाजारात ६० रुपये लिटरने दूध मिळत आहे. त्यामुळे एक किलो पनीरसाठी ३०० ते ३५० रुपयांचे दूध लागेल. मग, प्रोसेसिंग आणि पॅकेजिंगचा खर्च पकडला तर पनीरची किंमत ३५० रुपयांच्या वरतीच असेल, मग बाजारात १५०, २०० रुपयांना पनीर मिळतंय तिथं समजून जा की ते होऊच शकत नाही, हे बेसिक चाचणी आहे. पनीर हे १०० टक्के दुधापासून तायर होणारा पदार्थ आहे. बाजारात फक्त स्वस्त मिळतंय म्हणून जाऊ नका, ते पनीर भेसळयुक्त असू शकते. वर्षभरात केलेल्या तपासणीत ४० टक्के पनीरमध्ये घातक भेसळ आढळून आले”, असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढेंनी यावेळी केला.
