महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीवरून सध्या राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने व्हावी की बहुपर्यायी पद्धतीने, यावरून स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींमध्ये दोन गट पडले आहेत. या संपूर्ण वादावर आणि परीक्षा पद्धतीवर आता आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा वेळी त्यांनी परीक्षा पद्धतीवर मांडलेली ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी प्रशासनातील आपल्या प्रत्यक्ष अनुभवाचा संदर्भ देत वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचे जोरदार समर्थन केले आहे.

‘अनेक अधिकाऱ्यांना साधी टीपही लिहिता येत नाही’

प्रशासनातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, “जेव्हा तुम्ही प्रशासनात एखादा जबाबदार अधिकारी म्हणून काम करता, तेव्हा तुमच्याकडे आलेला शासन निर्णय कसा वाचायचा, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करायची आणि त्यातील मूळ गाभा सामान्य लोकांना कसा समजावून सांगायचा, याचे ज्ञान तुम्हाला असावे लागते. मात्र दुर्दैवाने, काम करताना मला असे अनेक अधिकारी आढळले ज्यांना एखादी छोटी टीप लिहायला सांगितली, तरी ती व्यवस्थित लिहिता येत नाही.”

‘आकलन क्षमता तपासण्यासाठी वर्णनात्मक परीक्षाच गरजेची’

स्पर्धा परीक्षेतील भाषेच्या पेपर्सचे महत्त्व अधोरेखित करताना मुंढे यांनी स्पष्ट केले, “मी स्वतः जेव्हा परीक्षा देत होतो, तेव्हा मलाही प्रश्न पडायचा की भाषा विषयात ‘एक-तृतीयांश सारांश लेखन’ का विचारले जाते? पण याचे खरे महत्त्व मला प्रशासकीय सेवेत आल्यानंतर समजले. जेव्हा एखादा नागरिक आपली समस्या घेऊन लांबलचक पत्र देतो, तेव्हा त्याचा मुख्य गाभा दोन-तीन ओळींत मांडता आला पाहिजे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “अधिकाऱ्यांची आकलन क्षमता अत्यंत चांगली असणे आवश्यक आहे. प्रश्नात नेमकं काय विचारलं आहे, उत्तरात काय अपेक्षित आहे आणि त्याचा खरा अर्थ काय आहे, हे समजून लिहिण्याची क्षमता केवळ वर्णनात्मक उत्तरे लिहितानाच तपासली जाऊ शकते. बहुपर्यायी पद्धतीत ही क्षमता तपासणे शक्य नाही.”

UPSC चा दाखला आणि स्पष्ट मत

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा दाखला देत तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, UPSC ने काळाच्या ओघात अनेक बदल केले, मात्र त्यांनी आपली ‘वर्णनात्मक परीक्षा पद्धत’ कधीही बदलली नाही. “जर आपल्याला प्रशासनात खरोखरच सक्षम, कार्यक्षम आणि संवेदनशील सरकारी अधिकारी घडवायचे असतील, तर तिथे वर्णनात्मक परीक्षा पद्धतच असायला हवी, या मतावर मी ठाम आहे,” असे स्पष्ट विधान तुकाराम मुंढे यांनी शेवटी केले.