Tukaram Mundhe : गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. या विरोधात राज्यभरात आणि विशेषतः पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन देखील केलं. त्यानंतर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी चौकशी आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली. तसेच एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात बोलताना केली होती.
दरम्यान, आता एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांच्या चौकशी आयोगाचे सचिव म्हणून नियुक्तीच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तुकाराम मुंढे यांची आज (१५ ऑक्टोबर) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांनी तुकाराम मुंढे यांना त्यांच्या एमपीएससीच्या चौकशी समितीच्या सचिव पदाच्या नियुक्तीबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी मोठं भाष्य केलं. ‘आमच्यात तोंडी चर्चा झाली. पण अद्याप माझ्याकडे नियुक्तीचं अधिकृत पत्र आलेलं नाही’, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
तुकाराम मुंढेंनी काय म्हटलं?
एमपीएससीच्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “माझ्याकडे नियुक्तीचं कोणतंही अधिकृत पत्र अद्याप आलेलं नाही. किंवा त्या संदर्भातील माझ्याकडे अद्याप कोणतेही आदेश नाहीत. पण आमच्यात तोंडी चर्चा नक्कीच झालेली आहे. मात्र, जोपर्यंत माझ्याकडे अधिकृत नियुक्तीचं पत्र येत नाही, तोपर्यंत त्यावर अधिक काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही. मी फक्त नियुक्तीच्या बातम्या मीडियात पाहिल्या, ऐकल्या आणि वाचल्या. तेवढीच माहिती माझ्याकडे आहे”, असं तुकाराम मुंढेंनी म्हटलं आहे.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काय घोषणा केली होती?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती, तर चौकशी आयोगाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. दरम्यान,‘एमपीएससी’चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, या आंदोलनात बोलाताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ही घोषणा केली होती.
तुकाराम मुंढेंची बदलीसंदर्भातील पोस्ट चर्चेत
एमपीएससी चौकशी आयोगाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली होती. मात्र, तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या असलेल्या एफडीए आयुक्तपदाच्या जबाबदारीचं काय? त्यांची बदली झालीय का? या चर्चांनी जोर धरला होता. यावर खुद्द तुकाराम मुंढे यांनीच काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलं. या संदर्भात मुंढे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर केली होती. मुंढे म्हणाले होते की, “माझी एफडीएमधून बदली झालेली नाही. मी अन्न व औषध प्रशासन विभागाचा (एफडीए) आयुक्त म्हणूनच कार्यरत आहे. असुरक्षित, निकृष्ट दर्जाचं व भेसळयुक्त अन्न आणि बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे यांच्या विरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
