अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे हे या पदावर बदली झाल्यापासूनच चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात मोठ्या शहरांपासून गावांमध्येदेखील तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखालील FDA नं छापे टाकून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांच्या आणि पुरेशी स्वच्छता न बाळगणाऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचा डंका फक्त महाराष्ट्रभरच नव्हे, तर देशभर आणि आता विदेशातही वाजू लागला आहे. अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र द न्यूयॉर्क टाईम्सने तुकाराम मुंढेंना आपल्या फ्रंट पेजवर स्थान दिलं असून त्यांचा उल्लेख ‘रॉकस्टार’ असा केला आहे. तुकाराम मुंढेंनी महाराष्ट्रात खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर केलेल्या कारवायांचा उल्लेख करणारं हे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर छापण्यात आलं आहे.
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धसका!
तुकाराम मुंढेंनी FDA च्या आयुक्तपदी बदली झाल्यापासून महाराष्ट्रात त्यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरातल्या अनेक प्रसिद्ध खाद्य पदार्थ विक्रेत्यांवरदेखील त्यांनी धाडी घातल्या आहेत. अचानक जाऊन केलेल्या पाहणीमध्ये अस्वच्छता, गैरप्रकार किंवा भेसळ आढळून आल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कठोर कारवाईदेखील ते करत आहेत. त्यामुळे राज्यभरातल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धसका घेतला आहे. हॉटेल्स, रेस्तराँ, दुकानदार अशा सर्वांनीच आपल्या खाद्यपदार्थांचा व किचनमधील स्वच्छतेचा दर्जा वाढवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या याच कामगिरीचं कौतुक न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या बातमीमध्ये करण्यात आलं आहे.
‘भारतात एक अन्न सुरक्षा अधिकारी रॉकस्टार झाला आहे! तुकाराम मुंढेंनी मुंबईतल्या वेगवेगळ्या किचन्समध्ये टाकलेल्या छाप्यांमुळे त्यांना अनपेक्षितपणे सेलिब्रिटी केलं असून भारतातील खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी मोठी चर्चा घडवून आणली आहे’, असं या वृत्तात नमूद केलं आहे.
मुंबईतील Olympia वरील कारवाईचा उल्लेख!
न्यूयॉर्क टाईम्सनं तुकाराम मुंढेंच्या पथकानं मुंबईतल्या Olympia या प्रसिद्ध कॉफी हाऊसवर केलेल्या कारवाईचा उल्लेख केला आहे. ‘गेल्या महिन्यात ऑलिम्पिया कॉफी हाऊसवर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये अनेक आरोग्यविषयक व सुरक्षाविषयक गैरप्रकार आढळून आले. त्यामुळे जवळपास १०० वर्षांपूर्वीचं ऑलिम्पिया बंद करण्याचे आदेश काढण्यात आले. तुकाराम मुंढेंनी केलेली ही एक हाय प्रोफाईल कारवाई होती. स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या किचन्सवर तुकाराम मुंढे करत असलेल्या कारवायांमधून भारतीयांची यासंदर्भातली अपेक्षाच पूर्ण होत आहे’, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
‘तुकाराम मुंढेंच्या नजरेतून कुणीही सुटत नाही’
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नजरेतून कोणताही व्यवसाय सुटत नाही, असा उल्लेख या वृत्तात करण्यात आला आहे. “जिथे बसून मॅट डेमॉन व टॉम हॉलंड यांनी काही महिन्यांपूर्वी चहापान केलं होतं त्या ऑलिम्पियावरही त्यांनी धाड टाकली. त्याचबरोबर रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते, सरकारी उपहारगृह, उच्चभ्रू रेस्तराँ आणि अगदी मॅकडोनाल्ड्ससारख्या आऊटलेट्सवरही त्यांनी छापे टाकले आहेत”, अशा शब्दांत तुकाराम मुंढेंचं कौतुक करण्यात आलं आहे.
“बॉलिवुड कलाकारदेखील तुकाराम मुंढेंचं कौतुक करतात. नामांकित रेस्तराँचे मालक कारवाईतून सूट मिळावी यासाठी त्यांच्या कार्यालयात खेटे मारतात. टीकाकार त्यांच्यावर अतिशयोक्तीचा ठपका ठेवत असले, तरी त्यांचे चाहते मात्र त्यांना आधुनिक युगाचे संत म्हणतात. हॉटेलमध्ये जेवायला जाणारी मंडळी हॉटेलचालकाला सतर्क करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर तुकाराम मुंढेंचा फोटो ठेवू लागली आहेत”, असंही या वृत्तात नमूद केलं आहे.
