Tukaram Mundhe FDA : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यात चांगलेच चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळखोरांवर धडक कारवाया केल्या आहेत. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून करण्यात येत असल्याच्या कारवायांची सध्या राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे. या घडामोडी दरम्यान एफडीएच्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध थेट मंत्री झिरवाळ यांच्याकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली होती. कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांकडे तक्रार का केली? याचा खुलासाही काही दिवसांपूर्वी मुंढे यांनी केला.

यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी एका प्रश्नावर दिलेल्या एका उत्तराची सध्या मोठी चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? यापैकी कोणते मुख्यमंत्री तुम्हाला जास्त चांगले वाटतात? या प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी लोकमतच्या मुलाखतीत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

आपण मागचे तीन, चार मुख्यमंत्री पाहिले, तर त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा आता देवेंद्र फडणवीस असतील. या सर्वांच्या कार्यकाळात तुम्हाला किमान एकूण अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग दिली गेली नव्हती. मग उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी कोणते मुख्यमंत्री तुम्हाला जास्त चांगले वाटतात? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. “मला तुमचा रिसर्च जास्त चांगला वाटतो”, अशी मिश्किल प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.

“तुम्ही विचारल्यामुळे मलाही आता ते चेक करावं लागेल की खरंच एकूण अडीच वर्षे कुठेही पोस्टिंग दिली गेली होती की नव्हती. कदाचित असेलही. मला आता माहिती नाही. कारण मी कधी असा कार्यकाळ मोजला नाही. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे हा विषय चर्चेचा नाही. पण आता हा विषय निघाला म्हणून बोलतो. माझ्या पहिल्या पोस्टिंगवेळीच मी वेटिंगवर होतो. तेव्हा मी वेटिंगवर का होतो? का नाही? हे मलाही माहिती नाही. मात्र, पोस्टिंगसाठी कुठेही वेटिंगवर राहणं हे सरकारसाठी देखील आणि अधिकाऱ्यांसाठी देखील चांगलं नसतं”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

लोकांनी तुम्हाला का फॉलो करायचं?

प्रशासकीय सेवेत असलेले फार कमी अधिकारी समाजासाठी आदर्श असतात. त्यांना माणनारा एक मोठा चाहता वर्गही निर्माण होतो. तुकाराम मुंढे यांनीही असा मोठा चाहता वर्ग निर्माण केला. पण तुकाराम मुंढेंना लोकांनी कशाकरता फॉलो करायला पाहिजे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत समर्पक उत्तर दिलं. तुकाराम मुंढे म्हणाले की, “मला कुणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. लोकांनी कॉन्शसला फॉलो करावं. प्रत्येक व्यक्तीत एक जन्मता टॅलेंट असतं, ते फक्त ओळखायला यायला पाहिजे. माणूस जन्माला येतो तेव्हा तो वस्तूतः चांगला किंवा वाईट नसतो. तो मुळातच चांगला असतो. आई-वडिलांच्या, शिक्षणाच्या, समाजाच्या माध्यमातून प्रत्येकाची जडण-घडण होत असते. त्यानंतर आजूबाजूच्या वातावरणातील कोणत्या गोष्टी अंगीकृत करतो यावर चांगले-वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने किंवा माझ्या मुलांनीही मला फॉलो करू नये. त्यांनी स्वतःच्या व्हिजनला फॉलो करावं. स्वतःत सकारात्मक बदल करावं आणि समाजात बदल घडवावा”, असं त्यांनी म्हटलं.