FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. त्यांच्या निर्णयांची त्यांच्या मुलाखतींची, त्यांनी सांगितलेल्या अनुभवांची कायमच चर्चा होते. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरातील हॉटेल्स, रेस्तराँ आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सच्या ठिकाणी काटेकोरपणे तपासण्या केल्या जात आहेत. अशा एका कारवाईचा किस्सा तुकाराम मुंढेंनी सांगितला आहे.
तुकाराम मुंढेंनी काय किस्सा सांगितला?
एका रेस्तराँची पाहणी करण्यासाठी आमच्या विभागाचे अधिकारी गेले होते. त्यावेळी पाहणी करताना आमच्या अधिकाऱ्यांना त्या रेस्तराँमध्ये उंदीर आढळून आले. एवढे उंदीर तुमच्या रेस्तराँमध्ये कसे काय? अशी विचारणा रेस्तराँच्या मॅनेजरला केली असता तो म्हणाला हे आमचे पाळीव उंदीर आहेत. रेस्तराँच्या मॅनेजरने दिलेलं उत्तर ऐकून काही क्षण अधिकारीही चक्रावले होते असा किस्सा तुकाराम मुंढेंनी एका मुलाखतीत सांगितला.
तुकाराम मुंढेंनी सांगितलेला किस्सा व्हायरल
तुकाराम मुंढे यांनी या घटनेचा उल्लेख करताना अन्न-सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास केवळ कारणं सांगून सुटका होणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला. एखादी चूक अनवधानाने झाली असेल तर संबंधितांना ती दुरुस्त करण्याची संधी दिली जाऊ शकते. मात्र, नियमांचं उल्लंघन झाल्यानंतर केवळ सबबी किंवा कारणं पुढे करून कारवाई टाळता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तुकाराम मुंढेंनी सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे याबाबत विविध प्रतिक्रियाही येत आहेत. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
सोशल मीडियावर लोक काय म्हणत आहेत?
तुकाराम मुंढेंनी सांगितलेला हा किस्सा ऐकून एक युजर म्हणतो, चला पेट इंडस्ट्रीला आता नवा प्राणी मिळाला व्यवसाय करण्यासाठी. आणखी एक युजर म्हणतो तुमचे उंदीर पाळीव आहेत तर त्यांना घरी घेऊन जा. कारण ते रेस्तराँमध्ये पाळून तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळ करत आहात. तिसरा युजर म्हणाला हा जो किस्सा तुकाराम मुंढेंनी सांगितला तो चिंताजनक आहे. कारण असा रेस्तराँमधून काहीही खाऊन बाहेर पडलेला माणूस आजारी पडला, त्याला अन्नातून विषबाधा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आणखी एक युजर म्हणाला तुमच्यासाठी जे पाळीव प्राणी आहेत ना त्यांच्यामुळे माणसांचा जीव जाऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? तर दुसरीकडे अनेक युजर्सनी तुकाराम मुंढेंचं कौतुकही केलं आहे. आपल्या राज्याला तुकाराम मुंढेंसारखे अधिकारी हवेतच. कारण ज्या ठिकाणी आपण जेवायला जातो तिथलं अन्न आणि ते अन्न जिथे बनवलं जातं ती जागा सगळं स्वच्छच असलं पाहिजे तरच तिथे जाण्यात अर्थ आहे असं काही युजर्सनी म्हटलं आहे.
