FDA म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या त्यांच्या धडक कारवाईसाठी चर्चेत आहेत. तसंच विविध मुलाखतींमधून ते त्यांचे विचारही कायमच मांडत असतात. आता त्यांनी अन्नातली भेसळ असो किंवा विचारांची भेसळ असो ती राष्ट्रासाठी घातक असते असं म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. अन्न आणि औषध प्रशास विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची सर्वत्र चर्चा सुरू असते. त्यामुळे विविध माध्यम समूहही त्यांच्या मुलाखती घेण्यास पुढे येत आहेत. अत्यंत बिनधास्त, निडर व्यक्तीमत्त्व असलेल्या तुकाराम मुंढे यांना त्यांचं काम करताना अनेक अडचणी येत असतील, पण या अडचणींवर मात करत ते त्यांची सार्वजनिक सेवा बजावण्याचं काम उत्तमपणे पार पाडत आहेत.
काय म्हणाले तुकाराम मुंढे?
सोशल मीडियामुळे दुभंग तयार होतो, या द्वेषाबाबत, तिरस्काराबाबत तुम्हाला त्रास होतो का? असं विचारलं असता तुकाराम मुंढे म्हणाले होय, मला या सगळ्याचा त्रास होतो. आपण सगळे सामाजिक प्राणी आहोत. आपण एकटं राहू शकत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोव्हिड होता. मी तेव्हा नागपूरमध्ये होतो. घरातच राहायचं आहे हे सांगितल्यावर दोन ते तीन दिवस लोकांना बरं वाटलं नंतर लोकांची तयारी नव्हती. कारण माणूस हा समाजात वावरणारा, मिसळणारा प्राणी आहे. आपल्याला मानसशास्त्रीयदृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या आपल्याला एखाद्या माणसाची गरज असते ती सोशल मीडियावरच्या तिरस्कारातून मिळणार आहेत का? आपण आभासी भिंती तयार करत असतो. आपण जे करतो ते कुणी थांबवू शकणार नाही.तुम्ही एक रिल पाहता ते ऑनेस्ट आहे आणि तुम्हाला ते पटतं आहे का याचा कुणी विचार करणार आहे का? एखाद्या गोष्टीला १० हजार लाईक आहेत म्हणून आपण ते लाइक करणार आहोत म्हणजे आपण त्यात गुरफटत चाललो आहोत त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागेल असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.
भेसळ अन्नातली असो किंवा विचारांमधली ती घातकच-तुकाराम मुंढे
भेसळीबाबत बोलताना तुकाराम मुंढे पुढे म्हणाले की नागरिकांनी आपल्या अन्नाबाबत चौकस असलं पाहिजे. तसंच आपल्या विचारांच्या बाबतीतही चौकस असलं पाहिजे. विचारांमध्ये डिजिटल युगात भेसळ होऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. भेसळ अन्नातली असो किंवा विचारांची असो ती समाज आणि राष्ट्रासाठी घातकच असते असं स्पष्ट मत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड या ठिकाणी भेसळमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र या दिशा सोशल सोशल फाऊंडेशनच्या वतीने तुकाराम मुंढेंची मुलाखत पार पडली. या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे.
