अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या माफियांची झोप उडवणारे महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कारवाईचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढे यांची आत्तापर्यंत अनेकवेळा बदली झाली आहे. याबाबत त्यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारला असता त्यांनी कुटुंबाच्या भावना काय ते सांगितलं आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यांची आजवर अनेकदा बदली झाली आहे. बदली झाल्यानंतर अनेकदा माणूस म्हणून त्रास होतोच. पण मी माझं कर्तव्य प्रथम मानतो असंही तुकाराम मुंढेंनी म्हटलंय.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

अनेकदा बदली झाल्यानंतर माझ्या पत्नीने मला हे सांगितलं की जे आपल्याला बरोबर घ्यायचं आहे तेवढंच घ्यायचं. कारण मूळात आपल्या गरजा कमी आहेत. त्यामुळे माझी बॅग भरुन ठेवलेली असते वगैरे असं नाही. पण माझ्या गरजा कमी आहेत असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंढेंनी News 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. त्याचप्रमाणे मुलाला मित्र नाहीत आणि तो मला बदली झाली की दोन प्रश्न विचारतो हे देखील सांगितलं आहे.

Tukaram Mundhe FDA Commissioner | Narhari Zirwal Maharashtra Minister | Food and Drugs Administration Maharashtra | Maharashtra Assembly Winter Session News
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे (संग्रहित छायाचित्र).

बदली झाल्यावर त्रास नक्कीच होतो, पण..

माझी आत्तापर्यंत अनेकदा बदली झाली आहे त्यामुळे मुलाच्या शाळाही बदलाव्या लागल्या. अनेक शाळा बदलल्याने मुलाचे मित्र होऊ शकले नाहीत. हा परिणाम माझ्यामुळे कुटुंबाला नक्की होतो. मी त्याचा गवगवा करत नाही पण बदली झाली की असा त्रास नक्की होतो. माझ्या कुटुंबाने मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. बदलीचे जे काही परिणाम होतात त्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून माझी आहे. मी देखील माणूस आहे रॉबर्ट नाही पण मी भावनांच्या आहारी जात नाही. आपल्याला कर्तव्य पार पाडायचं आहे या भावनेतून मी पुढे जातो.

माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो

मुलाच्या बाबतीत असं घडलं की पाचवीपर्यंत त्याच्या सहा शाळा बदलल्या गेल्या. सुरुवात मुंबईपासून झाली मग सोलापूर, पुणे, नाशिक असा प्रवास करावा लागला. पुन्हा मुंबईत आल्यावर त्याला एकाच शाळेत ठेवलं त्यामुळे त्याचे मित्र नाहीत. मित्र परिवार नाही. माझी बदली झाली की मुलगा दोन प्रश्न विचारतो तुमच्या बरोबर यायचं आहे का? शाळा बदलणार का? ही कठीण परिस्थिती असते. परंतु त्याला तोंड द्यावं लागतं. कारण जर भूमिका तुमची आहे, भूमिका तुम्ही घेतलेली आहे, एक रोल घेतलेला आहे आणि पब्लिक सर्व्हंट म्हणून तो जर आपल्याला तडीस न्यायचा आहे तर ते माझं दायित्व आहे. त्यामुळे मला गोष्टीवरुन सहानभुती नकोय, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

तुकाराम मुंढेंची आत्तापर्यंत कितीवेळा बदली झालीये?

१) ऑगस्ट २००५ – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर
२)सप्टेंबर २००७ – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
३) जानेवारी २००८ – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर
४) मार्च २००९ – आयुक्त, आदिवासी विभाग
५) जुलै २००९ – सीईओ, वाशिम
६) जून २०१० – सीईओ, कल्याण<br>७) जून २०११ – जिल्हाधिकारी, जालना<br>८) सप्टेंबर २०१२ – विक्रीकर सहआयुक्त मुंबई
९) नोव्हेंबर २०१४ – सोलापूर जिल्हाधिकारी
१०) मे २०१६ – आयुक्त, नवी मुंबई महापालिका
११) मार्च २०१७ – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे
१२) फेब्रुवारी २०१८ – आयुक्त, नाशिक महापालिका
१३) नोव्हेंबर २०१८ – सहसचिव, नियोजन
१४) डिसेंबर २०१८ -प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई
१५) जानेवारी २०२० – आयुक्त, नागपूर महापालिका
१६) ऑगस्ट २०२० – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
१७) जानेवारी २०२१ – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत
१८) सप्टेंबर २०२२ – आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
१९) जुलै २०२३ – पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग
२०) जून २०२४ – विकास आयुक्त (असंघटित कामगार)
२१) ऑगस्ट २०२५: सचिव, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, मंत्रालय
२२) मे २०२६: आयुक्त, अन्न व औषध प्रशासन