Tukaram Mundhe Sanjay Raut extortion charges : महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी अन्न सुरक्षा नियामकाच्या अधिकाऱ्यांवर लावलेल्या खंडणीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. हे आरोप सर्वसाधारण स्वरूपाचे असून त्यात कोणताही ठोस तपशील नाही, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. अन्न सुरक्षा अधिकारी हे हॉटेल व्यावसायिक, रेस्टॉरंट्स आणि क्विक कॉमर्स कंपन्यांकडून खंडणी उकळत असल्याचा आरोप करणारे संजय राऊत यांचं कोणतंही पत्र आपल्याला मिळालं नसल्याचा दावाही तुकाराम मुंडे यांनी केला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलं होतं?
संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून, “हॉटेल व्यावसायिकांना धमकावून आणि ब्लॅकमेल करून पैसे गोळा करण्याचा हा उद्योग आता पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू झाला आहे”, असा आरोप केला होता. पत्रात पुढे म्हटलं होतं की, “एफडीएचे नियुक्त अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकारी त्यांचे परवाने निलंबित करण्याची धमकी देऊन हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांकडून उघडपणे मोठी रक्कम गोळा करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, मुंडे एफडीए आयुक्त होण्यापूर्वी नोटीस बंद करण्याचा दर १० हजार ते १२ हजार रुपये होता. मुंडे यांनी दहशत निर्माण केल्यानंतर हाच दर ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत वाढला आहे.”
तुकाराम मुंढेंना पत्र मिळालंच नाही
या आरोपांना उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं, “मला पत्राची कोणतीही प्रत मिळालेली नाही. मीसुद्धा याबद्दल प्रसारमाध्यमांमधील वृत्तांत वाचले आहे. मी त्यांचा (संजय राऊत) खरोखर आभारी आहे. माझी त्यांना हीच विनंती आहे की, जर त्यांच्याकडे काही तपशील असतील, तर त्यांनी ते माझ्याशी किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत (ACB) शेअर करावेत, ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असेल.”
ज्या परवानाधारकांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे किंवा ज्यांनी पैसे दिले आहेत, त्यांनी अधिकाऱ्याचे नाव आणि व्यवहाराच्या तपशिलासह आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही मुंढे यांनी केलं.
एफडीए अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केल्यास आणखी छळ होईल, अशी भीती लहान आणि मध्यम स्वरूपाचे रेस्टॉरंट व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि क्विक कॉमर्स चालकांमध्ये आहे. याबद्दल विचारलं असता मुंढे म्हणाले, “तुम्हाला कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागेल. माझ्या तक्रार पोर्टलवरही आम्ही तक्रारदाराचे नाव लपवून ठेवतो. तक्रार कोणी केली हे कोणालाही कळत नाही. त्याचप्रमाणे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधला, तर मी तुमच्या ओळखीचा खुलासा माझ्या अधिकाऱ्यांसमोर करणार नाही. मला फक्त पुराव्याची गरज आहे. जर माझा कोणताही अधिकारी भ्रष्टाचार करत असेल, तर कृपया संपूर्ण तपशिलासह ती बाब माझ्या निदर्शनास आणून द्या.”
तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र एफडीए आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत अन्न सुरक्षा नियामकाने १२ हजार ८३ तपासण्या केल्या, ५ हजार २६९ सुधारणा नोटिसा बजावल्या आणि ६०३ परवाने निलंबित केले होते.
