एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार घडत असल्याचे आरोप केले गेले, विद्यार्थ्यांनी रोहित पवार यांच्या नेतृत्वात आंदोलनही केलं होतं. पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी आणि दोषींवर कारवाई केली जावी या मागणीने जोर धरला होता. ज्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक आयोग नेमत या प्रकरणी चौकशी केली जाईल असं सांगितलं होतं. या चौकशी आयोगात तुकाराम मुंढेंचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले या समितीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान आयोगाचं कार्यालय मुंबईत सुरू करण्यात आलं आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत ज्यांना माहिती द्यायची आहे, तक्रार करायची आहे ते करू शकतात असं आज तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC परीक्षेत गैरव्यवहार झाल्यानंतर सरकारने चौकशी आयोग नेमला आहे. हा आयोग माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमला आहे. मी त्यामध्ये सदस्य सचिव आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न पत्रिका किंवा उत्तर पत्रिका फुटल्याची कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आहे. या आयोगाचं कार्यालय दालन क्रमांक २०१ अन्न आणि औषध प्रशासन विभाग या ठिकाणी कार्यान्वित झालं आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती, परीक्षार्थी, विद्यार्थी यांनी त्यांचं निवेदन, त्यांची माहिती या कार्यालयात १६ नोव्हेंबर २०२६ द्यावेत. प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली जावी.
एकूण ९ परीक्षांची चौकशी आयोगातर्फे केली जाणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ९ परीक्षा घेतल्या होत्या. औषध निरीक्षक परीक्षा गट ब २०२५, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट अराजपत्रित सेवा परीक्षा २०२६, महाराष्ट्र गट क सेवा २०२५, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२५, अन्न आणि औषध प्रशासन मुख्य परीक्षा २०२३ अशा नऊ परीक्षांचा यात समावेश आहे. आम्ही या प्रकरणी चौकशी करेल. ज्या व्यक्तींकडे माहिती आहे किंवा तक्रार करायची असेल तर आम्ही जो पत्ता दिला आहे त्या ठिकाणी ही माहिती किंवा तक्रार द्यायची आहे. त्यांनी निवेदनं शपथपत्राच्या स्वरूपात आयोगाकडे दिली जावीत. वैध ओळखपत्र आणि स्व-साक्षांकित केलेल्या प्रति देण्यात याव्यात असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. फोनद्वारे काही माहिती द्यायची असेल तर आपण ती देखील देऊ शकता. ०२२-२०८६७६७७ या क्रमांकावर तुम्ही माहिती घेऊ शकता असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
१६ नोव्हेंबरपर्यंत ज्यांना निवेदनं द्यायची आहेत ते देऊ शकतात. या प्रकरणाची सुनावणी ही जाहीरपणे होणार आहे. पारदर्शक चर्चा झाली पाहिजे या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच निवेदनं ही व्यक्तीशः किंवा संस्था, संघटनांतर्फे दिली जाऊ शकतात. त्यासाठी प्रतिज्ञापत्र जोडणं आवश्यक आहे असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
