Tukaram Mundhe gets standing ovation at Pune, Video Viral: महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त आणि आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुण्यातील एका जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी तुकाराम मुंढे बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी आले होते. यावेळी व्यासपीठावर येत असताना उपस्थितांनी त्यांचे अतिशय भव्य असे स्वागत केले. रंगमंदिरात मुंढे यांनी प्रवेश करताच सर्वांनीच उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे उस्फुर्त स्वागत केले. तसेच त्यांची एंट्री मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी अनेकांनी आपल्या मोबाइलचा कॅमेरा सुरू करत रेकॉर्डिंगही केले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला तुकाराम मुंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते स्टेजजवळ येत असताना प्रेक्षकांनी उभे राहून त्यांना दाद दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक युजर्सनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
धडक कारवायांमुळे तुकाराम मुंढे चर्चेत
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम उघडली. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सुमारे १०० आस्थापनांचे परवाने त्यांच्या विभागाने निलंबित केले.
अनेक आस्थापनांमध्ये उघड्यावर ठेवलेले अन्न, बुरशी आलेले मांस आणि वारंवार वापरले जाणारे खाद्यतेल जप्त करण्यात आले. या धडक मोहिमेचे नेतृत्व तुकाराम मुंढे करत असल्यामुळे राज्यातील जनतेकडून त्यांचे कौतुक होत आहे. तर खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये धास्ती आणि दहशतीचे वातावरण आहे.
पाहा व्हिडीओ:
भाग्येश डोंबे यांनी तुकाराम मुंढे यांच्या स्वागताचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाल्या असून सात हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केली आहे. एखाद्या सेलिब्रिटीचे स्वागत व्हावे, अशाप्रकारची एंट्री तुकाराम मुंढेंची होत असल्याचे व्हिडीओमधून दिसून आले. राजकीय पुढाऱ्यांचेही इतक्या उत्साहात सामान्य लोक स्वागत करत नाही, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात इतक्या उस्फुर्तपणे स्वागत झाल्याचे पाहून तुकाराम मुंढेंही काहीसे भावुक झाल्याचे दिसतात. स्टेजवर पोहोचल्यानंतर ते सर्वांना हात उंचावून अभिवादन करतात आणि सर्वांनी बसून घ्यावे, असे हातवारे करून खुणावतात. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही खाली पाऊ शकता.
या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनातील आतापर्यंतच्या कारवाईची माहिती दिली. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबींवर भाष्य केले. आजवरच्या कारकिर्दीत अनेकदा बदली का झाली? बेधडक काम करताना राजकारण्यांचा दबाव येतो का? बदली झाल्यानंतर कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय असते? प्रशासनात काम करताना किती आव्हाने असतात? अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी मनमोकळे भाष्य केले.
काम करताना दबाव येतो, पण..
हॉटेल्स, रेस्टॉरंट्सवर कारवाई करत असताना कधी राजकीय दबाव येतो का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, “सिस्टम आहे आणि सिस्टममध्ये प्रेशर असतात. मात्र, त्यामध्ये काम करण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. आता एखादा व्यक्ती त्यावर वेगळ्या पद्धतीने वागणं किंवा त्यावर मी वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल हा भाग त्यामध्ये आला. कुठेही काम करत असताना प्रेशर नाही असे होत नाही. पण म्हणून त्याचा बागुलबुवा करायचा का हे आपल्यावर असते.”
सततच्या बदल्यांबाबत म्हणाले…
तुकाराम मुंढे यांच्या आजवरच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांच्या बदल्यांचे पाव शतक झाले आहे. वारंवार बदली होऊनही त्यांनी आपल्या कामाचा खाक्या कधीही बदललेला नाही. त्यामुळेच त्यांचे नेहमी कौतुकही होते. या मुलाखतीमध्ये सततच्या बदल्यांबाबत बोलताना मुंढे म्हणाले, मला वाटते की, बदल हा प्रगतीचा अविभाज्य घटक आहे. जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर माझ्यात जास्त चांगले बदल घडत जातात, असे मला वाटते.”
