अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवायांमुळे महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. माध्यमांमध्येही त्यांच्या कारवाईची मोठी चर्चा होत आहे. मात्र, “मी कोणताही सेलिब्रिटी नाही, केवळ माझे कर्तव्य बजावत आहे,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले. मुंबई प्रेस क्लबने बुधवारी आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात तुकाराम मुंढे बोलत होते. यावेळी त्यांनी व्यक्तीपेक्षा संस्थात्मक व्यवस्था आणि सक्षम यंत्रणा अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले.
“आम्ही नेहमीच एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्था आधीपासून अस्तित्वात आहे आणि त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. नवीन व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता भासल्यास त्यासाठीही आम्ही प्रयत्न करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही व्यवस्था प्रभावीपणे काम करायला हवी. एखादी व्यक्ती व्यवस्थेपेक्षा महत्त्वाची ठरता कामा नये,” असे मुंढे यांनी सांगितले.
अन्नसुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करताना एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहण्यापेक्षा मजबूत आणि प्रभावी यंत्रणा उभारण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपल्या बदलीबाबत बोलताना मुंढे यांनी निर्णय घेण्याचा अधिकार सक्षम प्राधिकरणाकडे असल्याचे सांगितले. “बदलीचे निर्णय सक्षम प्राधिकरणाकडून घेतले जातात,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
गणेशोत्सवातील महाप्रसाद, भंडाऱ्याच्या आयोजनावर तुकाराम मुंढेंची विशेष नजर असणार का?
गणेशोत्सव काळात महाप्रसादाच्या आयोजनावर एफडीएची विशेष नजर असणार का, असा प्रश्न मुंढे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “हा केवळ गणेशोत्सव, ईद किंवा इतर सणांचा विषय नाही.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार ‘फूड बिझनेस ऑपरेटर’ असलेल्या प्रत्येकाने नोंदणीकृत परवाना घेणे अनिवार्य आहे. जे नियम आधीपासून अस्तित्वात आहेत, त्यांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. विनापरवाना किंवा मानकांशिवाय अन्नपदार्थ तयार करणे हा थेट नियमभंग आहे. त्यामुळे सण असो वा नसो, नियमांचे पालन ही एक नियमित प्रक्रिया आहे.”
