Tukaram Mundhe Transfer controversy : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या बरेच चर्चेत आहेत. धडक आणि कडक प्रशासकीय निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल उभे राहिले आहेत. तुकाराम मुंढे यांची सध्याच्या विभागातून बदली किंवा हकालपट्टी केली जाऊ नये, अशी थेट विनंती परेश रावल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स पोस्ट केली आहे.

परेश रावल यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?

परेश रावल यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत लिहिलं, “अतिशय विनम्रतेने आणि आदराने सांगायचे झाल्यास, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे प्राधान्य आणि धर्म असायला हवा की, त्यांनी तुकाराम मुंढे यांचं संरक्षण करावं; जेणेकरून त्यांची या विभागातून बदली केली जाणार नाही किंवा त्यांना हटवले जाणार नाही.

का होत आहे तुकाराम मुंढेंचे कौतुक?

मे २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळ करणाऱ्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचं सत्र सुरू केलं आहे. राज्यभरात हजारो तपासण्या करून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निकृष्ट अन्नसाठा, भेसळयुक्त दूध, पनीर आणि बेकायदेशीर गुटखा जप्त केला आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध आणि बड्या हॉटेल्ससह थेट उच्च न्यायालयाच्या कँटीनमध्येही स्वच्छता नियमांचं उल्लंघन झाल्याचं पकडत त्यांनी कडक कारवाई केली. शाळांच्या ५० मीटर परिघात हाय-फॅट, हाय-शुगर असलेल्या जंक फूडच्या विक्रीवर आणि जाहिरातींवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे.

तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं असून, त्यांना आजवर अनेकदा बदल्यांना सामोरं जावं लागलं आहे. मात्र, सध्या त्यांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळत आहे. परेश रावल यांच्या या पोस्टमुळे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंढे यांच्या बदलीची आणि त्यांच्या कामगिरीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.