Tukaram Mundhe on Pandharpur wari VIP Darshan: शिस्तबद्ध स्वभाव, कठोर निर्णयक्षमता आणि कडक कार्यपद्धतीमुळे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात. सध्या राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून त्यांनी राज्यभरात राबवलेल्या कारवायांमुळे अन्न माफियांवर मोठा आळा बसल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेल्या आषाढी वारीलाही सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन आणि भाविकांच्या सोयीसाठी घेतलेल्या निर्णयांचे दोन जुने किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. For The People News ला दिलेल्या मुलाखतीत मुंढे यांनी हे किस्से सांगितले होते.
तुकाराम मुंढेंचा पहिला किस्सा:
“रांगेतील शेवटच्या भाविकाला दर्शन होईपर्यंत मंदिर बंद होणार नाही”
तुकाराम मुंढे यांनी सांगितलेला पहिला किस्सा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दर्शन व्यवस्थेशी संबंधित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी विठ्ठल मंदिर रात्री ११ वाजता बंद केले जायचे आणि सकाळी ४ वाजता पुन्हा उघडले जायचे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत ज्यांना दर्शन मिळाले नाही, त्या भाविकांना पहाटेपर्यंत थांबावे लागायचे.
ही व्यवस्था पाहिल्यानंतर मुंढे यांनी मंदिर समितीकडे यामागचे कारण विचारले. त्यावर त्यांना “हा वेळ विठ्ठलाच्या विश्रांतीसाठी असतो” असे उत्तर देण्यात आले. यावर मुंढे यांनी प्रतिप्रश्न केला, “हे ज्याला विश्रांती घ्यायची आहे त्याने ठरवले आहे की तुम्ही ठरवले आहे? विठ्ठल असे म्हणत नसेल की मी आता थकलो आहे, उद्या दर्शन घ्या. त्यामुळे मंदिर २४ तास खुले राहिले पाहिजे.”
यानंतर त्यांनी बैठक घेऊन स्पष्ट निर्देश दिले की, “कसल्याही परिस्थितीत रांगेत शेवटचा भाविक उभा असेपर्यंत मंदिर बंद होणार नाही.” या निर्णयामुळे पंढरपूरच्या मंदिरात फोफावलेली व्हीआयपी दर्शन संस्कृती मोडीत निघाली आणि सामान्य भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
तुकाराम मुंढेंचा दुसरा किस्सा:
“आषाढी वारीत २८ तासांची प्रतीक्षा १४-१६ तासांवर”
तुकाराम मुंढे यांनी सांगितलेला दुसरा किस्सा आषाढी वारीतील दर्शन व्यवस्थेबाबतचा आहे. आषाढीच्या काळात पंढरपुरात दोन ते तीन लाख भाविकांची गर्दी असते. अनेकांना दर्शनासाठी तब्बल २८ ते ३५ तास रांगेत उभे राहावे लागायचे.
मुंढे यांनी एवढा वेळ का लागतो, याची चौकशी केली असता त्यांना सांगण्यात आले की, रात्री १२ वाजता मंदिर बंद झाल्यानंतर साफसफाई केली जाते. त्यानंतर मंदिर समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते पूजा, मग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा आणि त्यानंतरच भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४ ते ५ तास खर्ची पडत होते.
यावर मुंढे यांनी निर्णय घेतला की, या पूजा वेगवेगळ्या न होता एकत्रच पार पाडल्या जातील. या एका निर्णयामुळे जवळपास २ तासांची बचत झाली. परिणामी, ज्या भाविकांना दर्शनासाठी २८ तास प्रतीक्षा करावी लागायची, त्यांचे दर्शन १४ ते १६ तासांत होऊ लागले.
वारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आलेले किस्से
आषाढी वारीला सुरुवात झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी सांगितलेले हे दोन्ही किस्से पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंढरपूरसारख्या मोठ्या धार्मिक स्थळी सामान्य भाविकांना केंद्रस्थानी ठेवून घेतलेले निर्णय आणि व्हीआयपी संस्कृतीला दिलेला आळा यामुळे मुंढे यांच्या कार्यपद्धतीची आजही चर्चा होताना दिसते.
