scorecardresearch

तुळजाभवानी देवीच्या महाअलंकारात निजामकालीन दागिन्यांचा रूबाब

शेकडो वर्षांच्या नक्षीदार जाळीकामाचा दुर्मिळ ठेवा

कुळमाता, कुलस्वामिनी, जगदंबा, वरदायिनी अशा विविध नावांनी भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या तुळजाभवानी देवीच्या महाअलंकारात निजामकालीन दागिन्यांचा रूबाब लक्षवेधी आहे. छायाचित्र: कालीदास म्हेत्रे, उस्मानाबाद.
कुळमाता, कुलस्वामिनी, जगदंबा, वरदायिनी अशा विविध नावांनी भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या तुळजाभवानी देवीच्या महाअलंकारात निजामकालीन दागिन्यांचा रूबाब लक्षवेधी आहे. शेकडो वर्षांच्या नक्षीदार जाळीकामाचा हा दुर्मीळ ठेवा तुळजाभवानी देवीच्या खजिन्याची शोभा अनेक शतकांपासून वाढवत आहे. कानजोड, बिंदी-बिजवरा, सूर्यहार, सोन्याचा कंबरपट्टा, अशी विविध आभुषणे तुळजाभवानी देवीच्या सौंदर्याला नेत्रदीपक झळाळी देत आहे.

तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील क्रमांक एकच्या पेटीत असलेल्या महाअलंकाराचा साज डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. यात शिवकालीन दागिन्यांबरोबरच निजामकालीन मुस्लीम संस्कृतीचा प्रभाव ठळकपणे अधोरेखित करणार्‍या अनेक दुर्मीळ दागिन्यांचा समावेश आहे. दागिना म्हणजे स्त्री-धन आणि त्यातील कलाकुसर ही स्त्री मनाला भुरळ घालण्याजोगीच असायला हवी. अगदी अशाच निजामकालीन नक्षीदार दागिन्यांचे दर्शन भाविकांना महाअलंकार पुजेच्या कालावधीत होणार आहे.

२७९ ग्रॅम वजनाचे निजामकालीन कानजोड देवीच्या महाअलंकारातील महत्वाचा साज आहे. सोन्याचे जाळीदार नक्षीकाम, त्यात पांढर्‍या रंगाच्या हिरकणी, सोबतीला गुलाबी माणिक, हिरवे पाचू आणि पिवळ्या धमक रंगाचा पुष्कराज हे या दुर्मीळ दागिन्याची खास वैशिष्ट्ये. त्याच्या खालोखाल दोन प्रकारची कर्णफुले आणि दोन पध्दतीचे झुबे आहेत. हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पध्दतीचा प्रभाव या कर्णफुले आणि झुब्यांवर स्पष्ट जाणवतो.

९९ ग्रॅम वजनाची चंद्रकोर मुस्लीम पध्दतीचा खास प्रभाव बाळगून आहे. देवीच्या कपाळावर बांधला जाणारा बिंदी-बिजवरा हा निजामकालीन दागिनाही आपले वेगळेपण जपून आहे. सोने, पाचू, हिरकण्या आणि मोती असा साज असलेला हा दागिना मुकूटाच्या खाली, देवीच्या कपाळावर केवळ विशिष्ट महाअलंकार पुजेलाच घातला जातो.

निजामकालीन संस्कृतीच्या घडणावळीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे सूर्यहार. ३२० ग्रॅम म्हणजे पाव किलो पेक्षाही अधिक वजन असलेला सहा पदरी सूर्यहार देवीच्या महाअलंकारातील महत्वाचा साज आहे. देवीच्या गळ्यात केवळ सणावाराला घातला जाणारा हा निजामकालीन दागिना कलाकुसरीचे अत्युच्च उदाहरण आहे. सूर्यकिरणांसारखा आकार असलेल्या जाळीदार नक्षीकामावर मुस्लीम घडणावळीची छाप बघताक्षणी प्रभावित करते. देवीच्या खजिन्यात दोन प्रकारचे कंबरपट्टे आहेत. त्यातला एक हिंदू संस्कृतीचा प्रभाव सांगणारा आणि त्यावर हिरेमोती, पाचू यांची विशिष्ट पध्दतीने मांडणी केलेला साज तर दुसरा अत्यंत जाळीदार अशा कंबरपट्ट्यावर केलेली सूक्ष्म नक्षी आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची अनेक साधने वापरून देखील असा दागिना घडविता येईल का ? अशी शंका वाटावी इतकी नेत्रदीपक कारागिरी या कंबरपट्ट्यावर कोरण्यात आली आहे. त्यामुळे निजामकालीन कालखंड आणि त्याचा रूबाब भाविकांना भुरळ घातल्याखेरीज राहत नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tuljabhavani devi ornaments tuljapur

ताज्या बातम्या