श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास भाविकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष, स्वतंत्र बसस्थानके, कर्नाटक मार्गावरील जादा वाहतूक, फलकाद्वारे प्रसिद्धी, बसची उपलब्धता व नियमितता, लॉक रूम, क्रेन, आंतरराज्य बस, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक प्रकारे सज्जता करण्यात आल्याची माहिती उस्मानाबाद एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी दिली.
उत्सव काळात नवीन व जुन्या बसस्थानकांवरील वाहतूक नियंत्रण कक्ष, तसेच कर्नाटक व राज्य जादा वाहतुकीसाठी नवीन बसस्थानक, सोलापूर-उस्मानाबाद मार्गावरील जादा वाहतुकीसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. घटस्थापना व दसरा सण या कालावधीसाठी नवीन बसस्थानकावर कर्नाटक राज्यासाठी व सोलापूर-उस्मानाबाद मार्गावरील जादा वाहतुकीसाठी जुन्या बसस्थानकावर स्वतंत्र नियंत्रण कक्षाद्वारे नियोजन करण्यात येणार आहे. अश्विनी पौर्णिमा कालावधीत जादा वाहतुकीस सोलापूर मार्गासाठी तुळजापूर आगारातील स्वतंत्र वाहतूक केंद्राद्वारे, तसेच जुन्या बसस्थानकावरून उस्मानाबाद, बार्शी मार्गावरील जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे इतर मार्गावरील वाहतूक नवीन बसस्थानकावरून होणार आहे. कर्नाटकातील मार्गासाठी वाहतुकीचे केंद्र नवीन बसस्थानकावर निर्माण करण्यात येणार आहे. आगारातील मदानावर वाहनतळही केले जाणार आहे. या कालावधीत बसवाहतुकीची कोंडी होऊ नये, या साठी नळदुर्ग मार्गाऐवजी लोहारा, नारंगवाडी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे.
गुलबर्गा, हुमनाबाद, सोलापूर आदी बस, वाहनतळांबाबत माहिती स्वतंत्र फलकाद्वारे करण्याचे नियोजन आहे. तसेच सर्व बस नियमित धावतील, याची दक्षता घेण्यात येत आहे. भाविकांना बस कमी पडणार नाहीत, याचे नियोजन केले आहे. तसेच वाहन रस्त्यावर उभे राहणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सर्व चालकांना सूचना दिल्या आहेत. जुन्या स्थानकावर भाविकांचे साहित्य ठेवण्यास लॉक रूमची व्यवस्था केली आहे. बाजार समितीत लॉक रूमची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. भाविक बसच्या टपावर बसणार नाहीत, या बाबत सर्व चालक-वाहकांना सूचना दिल्या आहेत. बसच्या वेगावर नियंत्रण ठेवून भाविकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठीही सूचना आहेत. यात्रा काळात इतर विभागांकडून क्रेन उपलब्ध करण्यात येणार आहेत.
यात्रा काळात घटस्थापना ते दसरा या सत्रात विभागाच्या १०५, तर इतर विभागांच्या १०० अशा एकूण २०० बस उपलब्ध करण्यात येणार आहेत. पौर्णिमेला विभागाच्या २५०, तसेच औरंगाबाद व इतर विभागांतील ४५० अशा ७०० बस, शिवाय पुणे विभागातील ३५० बस अशा एकूण १ हजार ५० बस उपलब्ध होणार असून तसे नियोजन करण्यात आले आहे.