घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी करून ३४ तोळे सोन्या-चांदीचे दागिने व ४४ हजार रुपयांची रोकड, असा एकूण १३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडली. आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे. 

तालुक्यातील दहिवडी येथील रहिवासी संतोष बाळासाहेब पाटील हे आपल्या कुटुंबीयांसमवेत तुळजापूर शहरात राहतात. गावाकडील नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे ते गावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरटय़ांनी शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संतोष पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे ३४ तोळे दागिने व ४४ हजार रुपयांची रोकड, असा एकूण १३ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर संतोष पाटील यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे. मंगळवार व बुधवारी तुळजापूर बसस्थानकात धाडसी चोऱ्या करून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. डिसेंबर महिन्यात दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या यमगरवाडी येथील जोगदंड कुटुंबीयांवर दरोडेखोरांनी टाकलेल्या सशत्र दरोडय़ात जोगदंड परिवारातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनांचा शोध लावण्यात तुळजापूर
पोलिसांना अद्यापि यश न आल्यामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.