तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव येथील एका गॅस वितरकाने चक्क एचपी (HP) कंपनीच्या ऑनलाइन आढावा बैठकीदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला असता, तब्बल ८ लाख रुपये किमतीचे १,२०० सिलिंडर काळ्या बाजारात विकल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

काटी सावरगाव येथील गॅस वितरक ज्ञानेश्वर माळी हे कंपनीच्या ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या आढावा बैठकीला उपस्थित होते. बैठकीदरम्यान अचानक त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागणी आणि पुरवठ्यातील दरी

मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. धाराशिव जिल्ह्यातही याचा मोठा फटका बसला असून, गॅस वितरकांकडे सिलिंडरचा साठा मर्यादित आहे. वाढत्या मागणीमुळे ग्राहक संतप्त होते आणि दुसरीकडे पुरेसा पुरवठा नसल्याने वितरक कोंडीत सापडले होते. याच दबावाखाली माळी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता.

तपासात धक्कादायक वास्तव समोर

या घटनेचा तपास सुरू असताना एक धक्कादायक वास्तव समोर आले. तामलवाडी पोलिसांनी जेव्हा गॅस कंपनीशी संपर्क साधून वितरकाच्या साठ्याचे ऑडिट केले, तेव्हा मोठी अनियमितता आढळली. कागदोपत्री आलेल्या सिलिंडरच्या संख्येत आणि प्रत्यक्ष वितरणाच्या आकड्यात मोठी तफावत होती. तपासात असे निष्पन्न झाले की, सुमारे १,२०० सिलिंडरची परस्पर विल्हेवाट लावत त्यांचा काळा बाजार करण्यात आला. या घोटाळ्याची एकूण किंमत अंदाजे ८ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ ठाकूर आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. वितरकाने आत्महत्येचा प्रयत्न नेमका नैराश्यातून केला की, हा घोटाळा उघड होईल या भीतीने केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे अजून कोणाचे हात आहेत का आणि काळ्या बाजारात विकलेले सिलिंडर कोठे गेले, याची माहिती तपास पूर्ण झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटींवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.