धाराशिव : महाराराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी तीर्थक्षेत्रात स्थानिक व्यापारी स्वतःच्या व्यवसायामुळे भाविकांना वेठीस धरण्याचे काम करत असल्यामुळे राज्य तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांची कुचंबणा होत असल्याची भावना तुळजाभवानी मातेच्या भाविक भक्तांमध्ये होत आहे. खासगी मालमत्ता असलेल्या व्यवसायिक गाळ्यांना लाखो रुपयांचे भाडे मिळत असताना नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्त्यावर जागा वापरण्यास द्यावी असा अट्टहास धरून तेथील स्थानिक व्यापाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. मात्र तडजोडीअंती तुर्तास या व्यापाऱ्यांना थोडी जागा देण्याची मान्यता देण्यात आली आहे.
तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोर असलेले व्यापारी गाळे हे मालकी हक्काचे आहेत. यातील एका गळ्याला वर्षाला अंदाजे वीस ते २५ लाख रुपयांचे भाडे आहे. येथील उलाढाल शंभर कोटीच्या पटीत आहे. त्याठिकाणी पूजेच्या साहित्यासह बांगडया भरण्याचा व्यवसाय होतो. त्यामुळे बांगड्या भरताना फुटलेल्या काचा जस्या आहे त्या जागी ठेवल्या जातात. भाविकांना त्या काचांमुळे इजा होण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला.
मालकी हक्काच्या जागेत व्यावसाय करण्याची कोणतीही हरकत नसताना तेथील स्थानिक व्यावसायिकानी नगरपरिषदेच्या जागेत आम्हाला गळ्याच्या समोर पाच फूट जागा दयावी अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे केली. मात्र त्यांनी महाद्वारासमोर असलेली अतिक्रमण हटवाण्याचा निर्माण घेतला. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मध्यस्थितीनंतर त्या व्यापाऱ्यांना स्वतःच्या गाळ्याच्या समोर तूर्तास फक्त एक फूट जागा वापरण्यासाठी देण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी राणा जगजीतसिंह पाटील तसेच तहसीलदार माया माने यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
महाद्वाराच्या समोर असलेल्या जागा या काही लोकांच्या मालकी हक्काच्या आहेत. परंतू त्यांनी त्याठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे भाविकांना त्रास होत आहे. उपलब्ध जागेत पोटभाडेकरू देत असल्यामुळे त्या रस्त्यावर अनेक समस्या निर्माण होत आहेत. वाहने रस्त्यावर लावल्यामुळे रस्ता अरुंद होत आहे. या अतिक्रमणाचा भाविकांना त्रास होत असल्यामुळे प्रशासनाने यामध्ये लक्ष्य घालण्याची गरज आहे. – किशोर गंगणे, पुजारी मंडळ, माजी अध्यक्ष, तुळजापूर.
व्यापाऱ्यांनी केलेले आंदोलन हे नगरपरिषदेच्या विरोधात नव्हते. त्याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात आले आहे मात्र तडजोड करून व्यापाऱ्यांना एक फूट जागा जास्त देण्याचे मान्य केले आहे. तेथील बांगडी बाजार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत.-विनोद गंगणे, नगराध्यक्ष, तुळजापूर
