रत्नागिरी : परदेशात पर्यटनासाठी नेण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील दोन महिलांची तब्बल १२ लाख ४० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुर्कीतील इस्तंबूल सहलीचे आकर्षक पॅकेज देण्याचे आश्वासन देत एका कथित टूर कंपनीच्या प्रतिनिधीने ही फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिल्लीतील संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थिबा पॅलेस रोड परिसरात राहणाऱ्या समृद्धी सुदेश मयेकर (वय ४५) आणि त्यांच्या मैत्रीण वैभवी विजय खेडेकर यांनी परदेश पर्यटनाचा बेत आखला होता. त्यासाठी त्यांनी ‘मेक माय टुर्स ’ या नावाने कार्यरत असलेल्या कथित टूर कंपनीशी संपर्क साधला. कंपनीचा प्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या संदिप कुमार याने तुर्कीतील इस्तंबूल सहलीचे आकर्षक पॅकेज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

त्याच्या सांगण्यावरून समृद्धी मयेकर यांनी स्वतःच्या सहलीसाठी पाच लाख रुपये, तर वैभवी खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबाच्या टूर पॅकेजसाठी सात लाख ४० हजार रुपये अशा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाईन जमा केली. ही रक्कम २४ एप्रिल २०२४ ते ११ जून २०२४ या कालावधीत भरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

रक्कम स्वीकारल्यानंतरही संबंधितांनी सहलीची कोणतीही व्यवस्था केली नाही. तसेच पैसे परत देण्याची मागणी केल्यानंतरही आरोपीने टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर समृद्धी मयेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी संदिप कुमार (वय ५१, रा. रोहिणी सेक्टर-११, उत्तर-पश्चिम दिल्ली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत. दरम्यान, कोणत्याही टूर कंपनीकडे ऑनलाईन पैसे भरण्यापूर्वी संबंधित कंपनीची नोंदणी, विश्वासार्हता आणि अधिकृतता पडताळून पाहावी, तसेच सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.