ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमशीन हॅक होण्याचा धोका असल्याने मतदानाच्या दिवसापासून मतमोजणीपर्यंत राज्यातील सर्व मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्या नावाने यासंदर्भातील रविवारी, २० ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. या पत्रात म्हटले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही भारतातील एक महत्वाची निवडणूक असून या निवडणुकीत सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीत मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट उपकरणांच्या माध्यमातून होत आहे.
मात्र, राज्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर संशय आहे की, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हॅक होऊन इच्छा नसलेल्या उमेदवारांनाच मते जाऊ शकतात. मोबाईल इंटरनेच्या माध्यमांतून प्रोफेशनल्स हॅकर्सकडून अशा प्रकारे हॅकिंग होणे शक्य आहे. त्यामुळे अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्ये टाळण्यासाठी मतदानाचा दिवस २१ ऑक्टोबर ते मतमोजणीचा दिवस २४ ऑक्टोबर या चार दिवसांच्या काळात मतदान केंद्रे आणि स्ट्राँगरुमच्या ३ किमी परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी.
महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही मतदानाच्या काळात याच पद्धतीने इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात यावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
#EVM व #VVPAT उपकरणे इंटरनेटद्वारे हॅक होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रत्येक पोलिंग बुथ व स्ट्रॉन्ग रुम्सच्या 3 कि.मी. परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवावी, अशी मागणी @NCPspeaks ने #ElectionCommission कडे नोंदवली आहे.#VVPATVulnerability pic.twitter.com/pD4QpFvmwD
— NCP (@NCPspeaks) October 20, 2019