ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले तर दहा जण जखमी झाल्याची दुर्घटना तुळजापूरमधील नंदगाव येथे घडली आहे. मृतांमध्ये एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा समावेश आहे. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नंदगाव येथील शेतकरी आरबळे यांच्या शेतातून गोकूळ कारखान्यास ऊस घेऊन जाताना ट्रक पूर्ण क्षमतेने न भरल्याने दुसर्‍या शेतातील ऊस तोडण्यासाठी मजूरांना घेवून जाताना हा अपघात झाला. नंदगावजवळील एका वळणावर रस्त्याच्या बाजूला हा ट्रक नाल्यात पलटी झाला. अपघातात ट्रकमधील ऊसावर बसलेले मजूर खाली पडले. त्यांच्या अंगावर ऊसाच्या मोळ्या पडल्याने गंभीर जखमी होऊन यात राजेंद्र मिठू राठोड (वय ३२), ललिता राजेंद्र राठोड (वय २८), स्वप्नील राजेंद्र राठोड (वय ८, सर्व रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) हे तीघे जागीच ठार झाले. यात या दाम्पत्याचा दुसरा पाच वर्षाचा मुलगा कार्तीक आश्चर्यकारकरित्या बचावला.

या अपघातात गोविंद भिल्लू पवार, धोंडीराम पवार, पारुबाई धोंडीराम पवार, इंदुबाई गोविंद पवार यांच्यासह दहा मजूर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नळदुर्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक डी. डी. राडकर, हवालदार एस. यु. तांबोळी, एस. एच. तेलंग, व्ही. बी. मुंढे, डी. एस. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने जखमींना बाहेर काढले. जखमींवर जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या राठोड दाम्पत्याच्या दोन शेळ्याही उसाखाली सापडून ठार झाल्या आहेत. एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने झडप घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र, यामुळे ऊसतोड मजुरांची असुरक्षितता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.