महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. “जोपर्यंत राज्यातील भाजपाचे ‘डबल इंजिन सरकार’ सत्तेवरून खाली खेचले जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी दिला. मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर नियोजित आंदोलनापूर्वीच पोलिसांनी तुषार गांधी, त्यांची मुलगी आणि सुमारे ६०० जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असतानाच पोलिसांनी तुषार गांधी यांच्यासह शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले होते केला.

“माझ्यावर गुन्हा दाखल होणे हीच माझी सनद”

कारवाईनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना तुषार गांधी म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. माझ्यासाठी ही एक प्रकारे सत्याग्रहाची सनदच आहे. मला सत्याग्रहींच्या रांगेत नेऊन बसवल्याबद्दल मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो.”

शासकीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत गांधी पुढे म्हणाले, “सत्तेत बसलेले लोक आंदोलनाला घाबरले आहेत. म्हणूनच नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर केला जात आहे. आजची पोलीस यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारी बाहुली बनली आहे. आमच्या या आंदोलनाचा विजय होईल, तेव्हा पोलिसांचीही या लाचारीतून मुक्तता होईल.”

‘गांधी आणि भगसिंगांनी परवानग्या मागितल्या असत्या तर…’

आंदोलनावरील निर्बंधांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी न्यायालयांनाही यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. “नागरिक अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत. अशा वेळी शांतता राखण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले पाहिजेत,” असे तुषार गांधी म्हणाले.

स्वातंत्र्यसंग्राम आणि सत्याग्रहाचे दाखले देत त्यांनी सरकारला खडसावले, “जर महात्मा गांधी आणि हुतात्मा भगतसिंग यांनी आंदोलने करण्यासाठी तत्कालीन इंग्रज सरकारकडून परवानग्या मागितल्या असत्या, तर देशाला स्वातंत्र्य कधीच मिळाले नसते.”

आंदोलनाला अराजकतावादी ठरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. “भाजपला हे आंदोलन अराजकतेचे वाटणारच, कारण या आंदोलनामुळे त्यांच्या सत्तेला थेट आव्हान मिळाले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.