शरद पवारांसोबत विजय मल्ल्याचा फोटो ट्वीट करत सदाभाऊ खोतांचा मलिकांना खोचक सवाल

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा एक फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रोज आरोपांचा सपाटा लावला आहे. एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यासह नवाब मलिक भाजपावर देखील गंभीर आरोप करत आहे. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे काही फोटो ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्वीट करत प्रश्न उपस्थित केला आहे. 

शरद पवार व फरार आरोपी विजय मल्ल्या यांचा फोटो ट्वीट करत सदाभाऊ खोत म्हणाले, “नवाब मिया पवार साहेबांच्या बरोबर कोण हे साधुसंत?, असे साधुसंत येती घरा तोची राष्ट्रवादीचा दिवाळी दसरा”, असा खोचक टोला खोत यांनी लगावला आहे. 

मलिकांच्या आरोपांनंतर आशिष शेलारांचा पलटवार

“दिवाळीनंतर जो बॉम्ब फडणवीस फोडणार आहेत तो फुटण्या आधीच त्या आवाजाला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले आहेत हे त्यांच्या बदलेल्या आवाजावरून दिसत आहे. पण दिवाळीनंतर बॉम्ब फुटेलच. समीर वानखेडे यांना चरित्राचा प्रमाणपत्र देणे हे भाजपाचे काम नाही हे मी स्पष्ट करतो. एनसीबीने ड्रग्जच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे ही भाजपाची मागणी आहे. विरोधकांनी विषय भरकवटण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज कितीही प्रमाणात असले तरी जर तो कायद्यामध्ये गुन्हा असेल आणि ड्रग्जच्या मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ती आम्हाला मान्य नाही. ड्रग्ज मिळाले तर एनसीबीने कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे. आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक जी माहिती देत आहेत ती सर्वसाधारण माहिती आहे. ही माहिती तुमचा जावई आत असताना गुप्त का ठेवलीत? हे आरोप नवाब मलिकांनी आज सांगावे असे वाटत असल्याने आठ महिने लपवले असतील. हे आरोप आठ महिने लपवण्याचे कारण काय याचे उत्तर नवाब मलिकांनी दिले पाहिजे,” असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

“हा सगळ्या लपवाछपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची सवयच लपवा छपवीची आहे आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यातील काही आरोप गंभीर देखील आहेत. म्हणून आमची मागणी आहे की नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची नार्को टेस्ट करावी. राज्य सरकारनेच दोघांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना जोरदार हल्ला चढवला. तसेच नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. लवकरच याबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. “नवाब मलिक यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना आता हे शेवटापर्यंत न्यावे लागेल,” असा सूचक इशारा फडणवीस यांनी मलिकांना दिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणत आहेत. जो फोटो त्यांनी ट्वीट केला आहे तो चार वर्षांपूर्वीचा आहे. रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. मी त्यांना मदत करत होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत. नवाब मलिकांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता दिसत आहे. रिव्हर मार्चने स्पष्ट केले आहे की तो भाड्यानं आणलेला माणूस आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही.”

काय म्हणाले होत नवाब मलिक?

भाजपाच्या अनेक नेत्यांचा ड्रग्ज क्षेत्रातील लोकांशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता.

याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केलाय. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दलीय.

जयदीप राणाचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय. वर्मा नावाच्या व्यक्तीने सर्व माहिती दिलीय. आम्ही देशाला सांगू इच्छितो की जयदीप राणा तुरुंगामध्ये आहे. एका सुनावणीमध्ये त्याला कोर्टात हजर करण्यात आलं नाही एनसीबी दिल्लीने तो साबरमती जेलमध्ये आहे असं सांगितल्याचं समजतंय, असं मलिक यांनी सध्या राणा कुठे आहे याबद्दल बोलताना सांगितलं. देवेंद्र फडणवीसांसोबत जयदीप राणाचं खास कनेक्शन असल्याचा दावा मलिक यांनी केला. फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबई नदी संरक्षणासाठी एक रिव्हर साँग तयार केलं होतं. सोनू निगम आणि अमृता यांनी ते गाणं गायलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार यांनीही अभियन केला होता, असं सांगत मलिक यांनी गाण्याचा आणि राणाचा काय संबंध आहे याबद्दल भाष्य केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tweeting vijay mallya photo with sharad pawar sadabhau khotan question to malik srk

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या