कोयना पाणलोट क्षेत्रात सलग सहा दिवस कोसळणाऱ्या पावसाने आता चांगलाच जोर धरला असून, धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. गेल्या ३० तासांत आज सायंकाळी ६ वाजता धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात २३१ एकूण १,१०३ मि.मी., नवजा विभागात २३९ एकूण १,३१० तर, महाबळेश्वर विभागात १९० एकूण ८४२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना शिवसागराची जलपातळी ७ फुटाने वाढून २,०५२ फूट तर, पाणीसाठा अडीच टीएमसीने वाढून १८.४७ टीएमसी आहे. धरणाचा पाणीसाठा १७.५४ टक्के आहे. दरम्यान, धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठीही पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळत असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. कोयना धरणक्षेत्रात सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने शिवसागराची जलपातळी झपाटय़ाने वाढत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.