अहिल्यानगर: बनावट विवाहाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही बनवेगिरी करणाऱ्या मुलीची सुटका करण्यासाठी वृध्द सासऱ्याचे अपहरण करण्याचा नाट्यमय गुन्हा वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे घडला. अपहरण करणाऱ्या चौघांपैकी दोघांना अहिल्यानगर शहरात पोलिसांनी पाठलाग करून पकडले तर दोनजण पसार झाले. अपहरण झालेल्या वृद्धाची पोलिसांनी सुटका केली.
अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी या कारवाईची माहिती दिली. राहुल दिलीप म्हस्के (वय ३२, रा. जालना) व सतीश उर्फ बालू विनायक जाधव (वय २९, रा. जालना) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना रिसोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मराठवाडा, विदर्भ भागात विवाहाची बनवेगिरी करण्याचे प्रकार घडत आहेत. तरुणांना वधू मिळत नसल्याने बनावट वधू उभी करून, प्रसंगी तिला पैसे देऊन विवाहाचा बनाव घडवून आणला जातो. वधू सासरी जाताच दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी ती घरातून दागिने रोख, रक्कम घेऊन पलायन करते. असे अनेक गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही असे गुन्हे घडले आहेत.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार असाच प्रकार वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात घडला. विवाहाचा खोटा बनाव उघडकीस आल्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला बाहेर पडू दिले नाही. त्यातून मुलीच्या नातेवाईकांनी वराकडील लोकांना शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली व वृद्ध वडील सिताराम नारायण खानजोडे (वय ६०, रा. आसेगाव, पेन, वाशिम) यांचे अपहरण करून घेऊन गेले. या आरोपींनी जाताना मापे (रिसोड, वाशिम) या ठिकाणी अंकुश मोहन राठोड (रा. बोरगडी तांडा, हिमायतनगर, नांदेड) हे त्यांच्या मित्रासोबत दवाखान्यात जात असताना त्यांची गाडी अडवून, काचा फोडून, मारहाण करून २२ हजार रुपये रोख पळवले. हा स्वतंत्र दरोड्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलेला आहे.
या घटनेबाबत रिसोड पोलिसांनी अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना माहिती दिली व गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत कळवले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, अंमलदार दीपक घाटकर, गणेश धोत्रे, भीमराज खर्से, राहुल डोके, बाळासाहेब नागरगोजे, सतीश भवर, योगेश कर्डिले, बाळासाहेब खेडकर, उमाकांत गावडे यांच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर रस्त्याने येणाऱ्या शेंडी बाह्यवळण चौकात नाकाबंदी केली. छत्रपती संभाजी नगरकडून एक मोटर थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र चालकाने चकवा देत पळ काढला. गुन्हे शाखेच्या पथकाने ही माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी, अंमलदार सतीश खामकर, सुरेश देशमुख, अक्षय रोहकले यांना कळवली व संशयित मोटार थांबवण्याच्या सूचना दिल्या.
हे पथक मोटारीचा पाठलाग करत असतानाच चालकाचे नियंत्रण सुटले व मोटर नगर शहरातील, एमआयडीसी ते सावेडी नाका दरम्यानच्या कॉटेज कॉर्नर भागातील रस्त्याच्या दुभाजकाला धडकून बंद पडली. सहायक निरीक्षक माणिक चौधरी व त्यांच्या पथकाने या मोटारीतील राहुल म्हस्के व सतीश जाधव या दोघांना ताब्यात घेतले व सिताराम नारायण खानजोडे यांची सुटका केली. आणखी दोन आरोपी पळून गेले. पकडलेल्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना रिसोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
