कराड : ऑनलाइन फसवणूक प्रकरणात मुंबई- दादर येथील सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून, त्यांनी वडगाव हवेली (ता. कराड) येथील युवतीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधित युवतीच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रगती प्रताप जगताप (रा. वडगाव हवेली) हिने याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिन मोहम्मद जाकीर (२७, रा. किनगाव, ता. पुन्हाना, जि. नुह, मेवात, हरियाणा) व आसिफ अली ताहीर हुसेन (२२ रा. खानपूर-घाटी, मेवात, हरियाणा) या दोघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूक प्रकरणात दिन जाकीर आणि आसिफ हुसेन या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांनी कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील प्रगती जगताप या युवतीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. प्रगती जगताप हिचे जिल्हा बँकेत खाते असून, या खात्यावर फेब्रुवारी २०२४ मध्ये एक लाख ३३ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर झाले होते. त्यांपैकी ४८ हजार रुपये २४ जुलै २०२४ रोजी प्रगतीच्या खात्यावर जमा झाले. मात्र, पैसे जमा झाल्याचे प्रगती जगताप हिला माहिती नव्हते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्याच दिवशी दुपारी एका अनोळखी क्रमांकावरून प्रगती जगतापला भ्रमणध्वनीवरून संपर्क झाला. मी तुमच्या वडिलांचे दहा हजार रुपये देणे आहे, असे सांगून ते पैसे मी तुमच्या खात्यात ऑनलाइन पाठवतो, असे त्याने सांगितले. काही वेळात प्रगतीच्या भ्रमणध्वनीवर १० हजार, २५ हजार आणि २० हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे संदेश आले. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने भ्रमणध्वनीवरून चुकून माझ्याकडून जास्त पैसे आलेत, तुम्ही माझे ३९ हजार ५०० रुपये परत पाठवा, असे सांगितले. त्यानुसार प्रगती जगतापने संबंधित व्यक्तीला तिच्या बँक खात्यातील ३९ हजार ५०० रुपये परत पाठवले. मात्र, तिने जे पैसे संबंधित व्यक्तीला पाठवले ते तिच्या शैक्षणिक कर्जातील होते, हे तिला नंतर समजले. प्रगती जगताप हिची झालेली ही फसवणूक संबंधित दोघांनी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.