भारतीय हत्यार कायदा आरोपाखाली फरारी असलेल्या इम्तियाजखान सरदार खान (२२) याच्यासह दोघांना येथील दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री अटक केली. या दोघांना पुसद पोलिसांच्या हवाली करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्य़ातील दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिन्यांपूर्वी तीन तरुणांना अटक झाली होती. त्यांच्याकडून पोलिसांना जिवंत काडतुसे, गन पावडर व शस्त्रासंबंधी साहित्य मिळाले होते. ज्या तीन तरुणांना अटक झाली होती, त्यांनी आम्ही ही शस्त्रे इम्तियाजखान सरदार खान (पुसद, जिल्हा यवतमाळ) याच्या सांगण्यावरून आणल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे दोन महिन्यांपासून पोलीस इम्तियाजचा शोध घेत होते. इम्तियाज आपल्या वडिलांसमवेत नांदेडच्या आसरानगर परिसरात राहत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. इम्तियाजचे वडील सरदार खान अमीरखान यांना एका खुनाच्या गुन्ह्य़ात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. कारागृहातून संचित रजेवर बाहेर पडल्यानंतर तो परतलाच नाही.