राहाता : राज्यभर खळबळ उडवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या तिघांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अहिल्यानगर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. एकाचा शोध पोलिस घेत आहेत.

भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. राहुल गंगाधर शिंदे (रा. कोपरगाव) व योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) या दोघांना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी बीड जिल्ह्यातील आहे. त्याचा शोध सुरू आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध महिलांवरील अत्याचाराचे नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या गुन्ह्यातील पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती कोपरगावमधील ‘बीएमडब्ल्यू’ या व्हाट्सअप ग्रुपवर राहुल शिंदे याने प्रसारित केल्या. नंतर या चित्रफीती योगेश आढाव याने बीड जिल्ह्यातील तरुणाला पाठवल्या, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

यावरून तिघांविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संवेदनशील व गंभीर गुन्ह्यात अनेक महिला पीडित असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्यांची ओळख उघड होणार नाही, याची खबरदारी घेऊन तपास करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोणाकडेही पीडित महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या घराची ओळख, तिच्या कुटुंबीयांची ओळख उघड होईल अशा चित्रफिती असल्यास त्यांनी त्या काळ नष्ट कराव्यात व प्रसारमाध्यमावर प्रसारित करू नये, असे आवाहन विशेष तपास पथकाने केले आहे.

अशा ओळख उघड होणाऱ्या चित्रफिती प्रसारित केल्यास संबंधितांवर व प्रसारमाध्यमाच्या ‘ग्रुप ॲडमिन’वर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्याची कायदेशीर कारवाई केली, जाईल असेही विशेष तपास पथकाने पत्रकात नमूद केले आहे.